ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 26- भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्याच्या तुलनेत अकाली मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा लागत असून उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. मध्यभारताचा विचार केल्यास विदर्भात सर्वात जास्त कॅन्सरचे रुग्ण असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अभ्यासातून पुढे आले आहे. यात पुरुषांमध्ये आढळून येणारा ५० टक्के कॅन्सर तर महिलांमध्ये आढळून येणारा २० टक्के कॅन्सर हा तंबाखूजन्य पदार्थांच्यावापरांमुळे होत असल्याची माहिती, वॉईस आॅफ टोबॅको व्हिक्टीमचे संयोजक डॉ. अभिषेक वैद्य यांनी दिली. जागतिक तबाखूविरोधी दिनानिमित्त आयोजित विविध कार्यकमांची माहिती देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॅन्सर रिलीफ सोसायटीचे सचिव अशोक क्रिपलानी, हॉस्पिटलचे सहायक संचालक डॉ. बी.के. शर्मा, डॉ. अंजली कोल्हे, डॉ. सरस्वती मृदुला, डॉ. टी.पी.सिंग आदी उपस्थित होते. डॉ. वैद्य म्हणाले, भारतात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. २०१२ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात उत्तर प्रदेशात १७,५९१,१११ तर बिहारमध्ये १४,६६१,३६७ रुग्णांचा कॅन्सरमुळे अकाली मृत्यू झाला. - ३१.४ टक्के लोकांना तंबाखूचे व्यसनदेशात ३४.६ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. यात सिगारेट ओढणारे ५.७ टक्के, बीडी पिणारे ९.२ टक्के तर तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांची संख्या २५.९ टक्के आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण ३१.४ टक्के आहे. ३.४ टक्के लोक सिगारेट पितात, २.७ टक्के बीडी ओढतात तर २७.६ टक्के मुले तंबाखूजन्य पदार्थ खातात. मध्य भारताचा जर विचार केला तर छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, ओरिसाच्या तुलनेत विदर्भात कॅन्सरचे सर्वात जास्त रुग्ण आढळून येतात. यात तोंड, जबडा, आहार नलिका व फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण मोठे आहे.
कॅन्सरमुळे दरवर्षी १० लाख रुग्णांचा मृत्यू
By admin | Published: May 26, 2016 8:34 PM