बडनेऱ्यात विजयासाठी उमेदवारांचे देवांना साकडे धार्मिक स्थळांवर गर्दी बडनेरा : बडनेऱ्यात प्रमुख पक्षांसह अपक्षांनी विजयासाठी सर्वप्रथम देवांना साकडे घातले आहे. गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारांसह कार्यकर्तांनी देवालयांमध्ये एकच गर्दी केली आहे. प्रचारांचे नारळ फोडून उमेदवार प्रचाराला लागले आहेत. महापालिका निवडणुकीत बडनेरा शहरात दोन प्रभाग आहेत. सर्वच पक्षासह अपक्षांनी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. मोठ्या संख्येत येथून उमेदवार लढणार आहेत. ८ फेब्रुवारीला चिन्ह प्राप्त झाले असून, रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी सर्वप्रथम देवांना विजयासाठी साकडे घातल्याचे दिसून आले. बडनेऱ्यात मोठ्या संख्येत मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा व बुद्धविहार आहेत. या सर्वच ठिकाणी उमेदवारांची गर्दी दिसून आली. उमेदवारांसह मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांना सोबत घेवून देवांना साकडे घालण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून महापालिका निवडणुकीचा खऱ्या अर्थाने बिगुल वाजला आहे. आपणच कसे सरस राहू यावर प्रत्येक उमेदवार भर देत आहे. नारळ, हार, पेढ्यांचा प्रसाद उमेदवारांकडून वाहला जात आहे. (शहर प्रतिनिधी)
बडनेऱ्यात विजयासाठी उमेदवारांचे देवांना साकडे
By admin | Published: February 16, 2017 1:34 PM