- यदु जोशी, मुंबईज्या जिल्ह्यांमध्ये भाजपाचा एकही आमदार नाही अशाच जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे,अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. उस्मानाबाद, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये भाजपाचा एकही आमदार २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून येऊ शकला नव्हता. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन या जिल्ह्यांमध्ये पक्ष बळकट करण्याचा एक भाग म्हणून या चार जिल्ह्यांपैकी दोन जिल्ह्यांतच विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ १२३ आहे. त्यांचे चार आमदार सहज निवडून येतील. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाला राजकीय कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आमचा पाचवा उमेदवार निश्चितपणे जिंकेल, असा विश्वास आधीच व्यक्त केला आहे. रत्नागिरीमधून माजी आमदार बाळ माने, सिंधुदुर्गमधून माधव भंडारी, अतुल काळसेकर व प्रमोद जठार, उस्मानाबादमधून मिलिंद पाटील, सुजितसिंह ठाकूर, सातारामधून अतुल भोसले ही संभाव्य नावे आहेत. भाजपा आपल्या दोन जागांव्यतिरिक्त इतर तीन जागा मित्र पक्षांना देणार आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची नावे निश्चित मानली जातात. रिपाइंतर्फे अविनाश महातेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. ते पक्षाध्यक्ष खा.रामदास आठवले यांचे निकटवर्ती मानले जातात.
आमदार नसलेल्या जिल्ह्यांमध्ये उमेदवारी
By admin | Published: May 25, 2016 2:15 AM