- अभिनय खोपडेवर्धा : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू असताना वर्ध्यात एका अनोख्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. तांबट, पांढऱ्या छातीचा धीवर, ठिपकेवाला पिंगळा, भारतीय नीलपंख आणि कापशी घार हे चार खरेखुरे ‘पक्षी’ उमेदवार आहेत. विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना मतदानाचा हक्क असल्याने निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.जैववैविध्यतेमुळे वर्ध्याचा परिसर ‘समृद्ध’ मानला जातो. नानाविध पक्ष्यांच्या रहिवासामुळे सहजीवन सदैव बहरलेले असते. आता या शहराला ‘बर्ड्स फ्रेन्डली’ अशी नवी टॅगलाइन लाभावी म्हणून शहरपक्षी’ (सिटी बर्ड) निवडण्याची कल्पना पर्यावरणवादी मंडळींना सुचली. नगरपरिषद व बहार नेचर फाऊंडेशनने पुढाकार घेतला. त्यातून निवडणुकीचा कार्यक्रम आखला गेला. ही मतदानप्रक्रिया १५ आॅगस्टपर्यंत चालेल. मतदानासाठी गुगल लिंकही उपलब्ध आहे. तिथे क्लिक केल्यास पाच पक्ष्यांची माहिती असलेली मतपत्रिका समोर येते.शाळा, कॉलेजांतप्रचार आहे सुरूशाळा-महाविद्यालयांत या निवडणूकीचा प्रचार केला जात आहे. निसर्ग अभ्यासक डॉ. तारक काटे, डॉ. गोपाल पालीवाल व प्रा. अतुल शर्मा हे निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. शहरपक्षी निवडीची ही दुसरी निवडणूक असून, २०१७ मध्ये सावंतवाडीत अशी निवड झाली होती. पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनीही मतदानाचा हक्क बजावला.निसर्गाशी मैत्री करूनच मानवाला विकास साध्य करावा लागेल. विद्यार्थी, नागरिकांमध्ये निसर्गाशी मैत्री करावी ही जाणीव निर्माण करण्याची ताकद या उपक्रमात आहे.- प्रा. किशोर वानखडे, अध्यक्ष, बहार नेचर फाऊंडेशन, वर्धा
पिंगळा, धीवर अन् घार निवडणुकीतील उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 3:29 AM