सातारा : तीनच दिवसांत मतदानयंत्रे बोलू लागतील आणि जय-पराजय निश्चित होईल. त्यामुळे दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होण्याची शक्यता सर्वांनीच गृहीत धरली आहे. मात्र, निवडणुकीतील विजय फटाकेमुक्त करून पर्यावरण संतुलनात वाटा उचलून आपण जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याचे संकेत द्यावेत, असे आवाहन जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांना भेटून करण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विवेक वाहिनीने ठरविले आहे. रविवारी (दि. १९) मतमोजणीचा दिवस आहे. दिवाळीही तोंडावर आहे. परंतु निवडणुकीत विजय निश्चित होण्यापूर्वीच प्रचारातील पदयात्रांपासून सर्वत्र फटाके फोडले गेल्याचे जिल्ह्यातील नागरिकांनी पाहिले आहे. ज्या भागातून नेत्याची पदयात्रा जाणार असेल, तेथील कार्यकर्ते फटाक्यांची सर रस्त्यावर पसरूनच नेत्याची वाट पाहत असत. निवडणुकीपूर्वी इतके फटाके फुटले, तर निकालानंतर किती फुटतील, याचा अंदाजच न केलेला बरा! या पार्श्वभूमीवर, प्रदूषणमुक्तीचा हेतू मनात ठेवून विजयी उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना आधीच आवाहन करावे आणि फटाके फोडण्यापासून परावृत्त करावे, अशी ‘अंनिस’ची भूमिका आहे. येत्या दोन दिवसांत सर्व प्रमुख उमेदवारांना भेटून ही भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. निवडणूक निकालांनंतर तीनच दिवसांनी दिवाळी येत आहे. त्यावेळीही भरपूर प्रमाणात फटाके फोडले जातील. वातावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर मानवनिर्मित प्रदूषणात भर पडू नये म्हणून निवडणूक निकाल आणि दिवाळी डोळ््यांसमोर ठेवून ‘अंनिस’ आणि विवेक वाहिनीने अनेक उपक्रम प्रस्तावित केले आहेत. (प्रतिनिधी) बालगोपाळांना आवाहन ‘अंनिस’तर्फे दरवर्षी विविध शाळांमध्ये फटाकेमुक्त दिवाळीचे आवाहन करणारे पत्रक वाटले जाते. यावर्षी फटाकेमुक्तीचे आवाहन करणारे संदेश शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, अभिनेता नाना पाटेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश आमटे, डॉ. नरेंद्र जाधव यांनी या पत्रकावर केले आहे. या पत्रकाच्या तळाशी एक स्लिप असेल. ‘मी आतापर्यंत किती रुपयांचे फटाके फोडत होतो आणि यावर्षी त्यात किती कपात करेन,’ याबाबतचे हे प्रतिज्ञापत्र असेल. पालकांशी बोलून विद्यार्थ्यांनी ते भरायचे आहे. गेल्या वर्षी या उपक्रमातून बारा ते पंधरा कोटींची बचत झाल्याचे स्पष्ट झाले होते. यावर्षी अशी दोन लाख पत्रके काढण्यात आली असून, ती वाटण्यास प्रारंभ झाला आहे. शिक्षकाचा अभिनव उपक्रम साताऱ्यातील शिक्षक मोहन बेदरकर यांनी फटाक्यांचे दुष्परिणाम कवितेद्वारे मांडले असून, त्याचे एक सचित्र पत्रक तयार केले आहे. रोटरी क्लबच्या सहकार्याने या पत्रकाच्या दहा हजार प्रती तयार करण्यात आल्या असून, साताऱ्यातील शाळाशाळांमध्ये त्यांचे वाटप सुरू झाले आहे. परीक्षा संपण्यापूर्वी जास्तीत जास्त मुलांच्या हातात हे पत्रक पोहोचावे, असा बेदरकर यांचा प्रयत्न आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशेषत: व्यापारीवर्गाकडून मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. लक्ष्मीपूजनापूर्वी ‘अंनिस’चे पुण्यातील कार्यकर्ते दरवर्षी लक्ष्मी रस्त्यावरून रॅली काढतात आणि कमीत कमी फटाके फोडण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना करतात. याच धर्तीवर साताऱ्यातही रॅली काढण्याचा प्रयत्न सातारा शाखेकडून यावर्षी सुरू आहे. - डॉ. हमीद दाभोलकर फटाके नको, पुस्तके घ्या! ‘अंनिस’च्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शाखेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फटाक्यांच्या स्टॉलजवळ पुस्तकांचा स्टॉल सुरू करण्यात येणार आहे. फटाक्यांना पुस्तकांचा पर्याय देण्याचा हा अभिनव उपक्रम अन्य शाखांतर्फेही सुरू करण्याचा मानस आहे.
उमेदवारांनो, विजय असू द्या फटाकेमुक्त..!
By admin | Published: October 16, 2014 10:09 PM