मुंबई : पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावर शिवसेनेला घेरतानाच मराठीचाही मुद्दा जवळ करण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन करत भाजपाने रविवारी, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराची औपचारिक सुरुवात केली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या सर्व उमेदवारांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करत पालिका प्रचाराचा नारळ फोडला. ‘मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपाचा डाव आहे,’ असा आरोप शिवसेना आणि मनसेकडून होत आहे. हा आरोप खोडून काढत मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने हुतात्मा स्मारकापासूनच आपल्या प्रचाराला सुरुवात केली. तसेच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित मेळाव्यात पक्षाच्या सर्व उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ घ्यायला लावली. नगरपालिका निवडणुकीत भाजपा नंबर १चा पक्ष ठरला आहे. त्याचप्रमाणे आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपा नंबर १ ठरेल. मात्र आपली शक्ती वाढत असल्याने काही जण अस्वस्थ होत आहेत. मुंबईला भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार देण्यासाठी स्वबळावर निवडणूक जिंकायची आहे, अशा शब्दांत दानवे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. भाजपाचा जोर असलेल्या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी छुपी युती केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला. अनेक प्रभागांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसविरुद्ध भाजपाची थेट लढाई आहे. भाजपाला रोखण्यासाठी या दोन्ही पक्षांनी एकमेकांना पूरक असे उमेदवार दिले आहेत. ४२ प्रभागांमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेने मॅच फिक्सिंग केली आहे,’ असा आरोप आशिष शेलार यांनी केला. (प्रतिनिधी)
उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ
By admin | Published: February 05, 2017 11:52 PM