मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ७ जागांसाठी रविवारी सर्वत्र अत्यंत चुरशीने मतदान झाले. कोल्हापूर येथे १०० टक्के तर सोलापूर, अहमदनगर, धुळे-नंदुरबार आणि अकोला-बुलडाणा येथे ९९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मुंबईत २ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २३०पैकी २०१ नगरसेवकांनी मतदान केले. मनसेने या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. नागपूरमध्ये भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास हे बिनविरोध निवडून आले आहेत. बुधवार, ३० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.मुंबईत शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे अशोक उर्फ भाई जगताप आणि अपक्ष उमेदवार प्रसाद लाड या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. लाड यांच्या उमेदवारीमुळे मते फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रत्येक पक्षाने विशेष खबरदारी घेतली. शिवसेनेकडे विजयासाठी पुरेसे संख्याबळ असल्याने कदम यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र, दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना नगरसेवकांना दुसऱ्या पसंतीची मते न टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काँग्रेस आघाडीच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेसची मते फुटू नयेत यासाठी सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादी आणि समाजवादीची मते लाड यांच्या पारड्यात मते टाकल्याची चर्चा रंगली आहे. नगरमध्ये ९९ टक्के मतदानअहमदनगर येथे ४२९ पैकी ४२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, मतदानाची ही टक्केवारी ९९़ ७७ टक्के एवढी आहे. आघाडीकडून विद्यमान आमदार अरुण जगताप (राष्ट्रवादी), तर युतीकडून प्रा. शशिकांत गाडे (शिवसेना) हे दोन प्रमुख उमेदवार मैदानात होते. जयंत ससाणे (काँग्रेस), मच्छिंद्र सुपेकर (अपक्ष) यांनी आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता. महापालिकेतील राष्ट्रवादीचा नगर महापालिकेतील गटनेता समद खान गोळीबारप्रकरणात फरार आहे़ अटक होईल, या भितीने तो मतदानासाठी आला नाही़ श्रीगोंदा येथील किरकोळ वादावादी वगळता जिल्ह्णातील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली़.......................अकोला : ९९.४ टक्के मतदानविधान परिषदेच्या अकोला, बुलडाणा, वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत ९९.४ टक्के मतदान झाले. गत १२ वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया व राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार रवींद्र सपकाळ यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. कोल्हापुरात १०० टक्के मतदानसाऱ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधान परिषदेसाठी १०० टक्के मतदान झाले. ३८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील व भाजपापुरस्कृत अपक्ष उमेदवार महादेवराव महाडिक यांच्यात ही लढत झाली. हातकणंगले केंद्राबाहेर दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला. हा अपवाद वगळता मतदान अत्यंत शांततेत झाले. सतेज पाटील गटाच्या ५६ मतदारांनी भगवे लहरी फेटे बांधून येऊन शक्तिप्रदर्शन करत मतदान केले. सोलापुरात चुरशीची लढत । सोलापुरात ३९८पैकी ३९६ मतदारांनी हक्क बजावला. काँग्रेस आघाडीचे विद्यमान आ़ दीपक साळुंखे व भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांच्यात चुरशीची लढत आहे. बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे व माकपच्या सुनंदा बल्ला यांनी मतदान केले नाही; मात्र याच पक्षाच्या अन्य चार नगरसेवकांनी मतदान केले. धुळे, नंदुरबारमध्ये ९९.२४% मतदान । धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण ९९.२४ टक्के मतदान झाले आहे. काँग्रेस आघाडीचे अमरिशभाई पटेल व भाजपा-शिवसेना युतीचे डॉ. शशिकांत पाटील हे उमेदवार रिंगणात होते. ३९५पैकी ३९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला; तर ३ जणांनी मतदानाकडे पाठ फिरविली.
उमेदवारांचा जीव टांगणीला
By admin | Published: December 28, 2015 4:25 AM