उमेदवारांना ‘क्रॉस व्होटिंग’चा धोकाअमरावती : महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार पॅनेलला मतदान करा, अशी विनवणी मतदारांना करीत आहेत. काही जागांवर राजकीय पक्ष तर काही जागांवर स्थानिक आघाड्याच्या उमेदवारांमध्ये थेट लढतीचे चित्र आहे. मतदानात नाती, गोती, धर्म, पंथ, पैसा, गावचा, शेजारचा, वस्तीचा आणि जवळील उमेदवार या बाबींना अधिक महत्व आले आहे. अशावेळी ‘सॉलिड व्होटिंग’ ऐवजी ‘क्रॉस व्होटिंग’ होण्याची दाट शक्यता आहे. मात्र ‘क्रॉस व्होटिंग’ टाळण्यासाठी उमेदवार पॅनलला मतदान करण्याचा प्रचार करीत आहेत.महापालिकेत एका मतदाराला चार तर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत तीन उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. काही जागांवर राजकीय पक्ष, नाती, जवळील उमेदवार असल्याने एक मत तर द्यावे लागेल, या मानसिकेत अनेक मतदार आले आहेत. मात्र एकाच पॅनेलमध्ये वेगवेगळे मतदान करताना भंबेरी उडण्याची शक्यता अधिक आहे. महापालिका निवडणुकीत प्रभागात अनेक जागेसाठी एक किंवा दोन उमेदवार रिंगणात आहेत. मात्र चार उमेदवारांना मतदान केल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही, ही बाब आयोगाने स्पष्ट केली आहे. त्यामुळे मतदारांना कोणत्या उमेदवारांना मतदान करावे, ही गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे राजकीय पक्षाचे उमेदवार हे पॅनलच्या चारही उमेदवारांना मतदान करण्याची विनवणी करीत आहेत. निवडणुकीत ‘ईलेक्टीव्ह मेरीट’ हा शब्द परवलीचा बनला आहे. उमेदवारीसाठी अनेक निकष असतात. हे निकष म्हणजे उमेदवारांसाठी निवडणुकीच्या रिंगणात डाव, प्रतिडाव सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरणे आणि शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी होणारी गर्दी या डाव, प्रतिडावामागे उत्तर दडलेले आहे. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पैसा हा मोठा ‘फॅक्टर’ आहे. उमेदवार निवडताना जात, धर्म, व्यवसाय, वस्ती, गाव, जवळीक, भावकीचा या बाबींना नेत्यांचे प्राधान्य राहते. विशेषत: उमेदवार निवडताना मतदार संख्या जास्त असलेली गावे, वस्ती, परिसराला महत्व दिले जाते. कारण त्या परिसरातील उमेदवार रिंगणात असला की मतदारांचा कल आपसुकच त्याच्या बाजुने उभा राहतो. मात्र एकच वस्ती किंवा गावातील अधिक उमेदवार मैदानात असल्यास ‘क्रॉस व्होटींग’ची शक्यता अधिक राहते. परिसरातील अथवा गावचा उमेदवार असल्याने एक मत त्याला तर दुसरे मत राजकीय पक्षाला अशा स्थितीत ‘क्रॉस व्होटींग’ची दाट शक्यता आहे. परंतु ही बाब टाळण्यासाठी नेत, उमेदवार दक्षता घेत आहेत. (प्रतिनिधी)
उमेदवारांना ‘क्रॉस व्होटिंग’चा धोका
By admin | Published: February 16, 2017 9:13 PM