मुंबई : निवडणुकीला अवघा महिना शिल्लक असल्याने प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची संभाव्य उमेदवारांची लगीनघाई सुरु झाली आहे. मतदारांची माहिती झटपट मिळावी आणि त्यांना ट्रॅक करता यावे यासाठी बहुतांशी उमेदवारांनी मोबाईल अॅपला पसंती दिली आहे. एका क्लिकवर माहिती मिळविण्यास मदत करणाऱ्या अशा प्रकारच्या अॅपची मागणी उमेदवारांकडून दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती अॅपनिर्माते देत आहेत.फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी सगळीकडेच जोरदार तयारी सुरु आहे. संभाव्य उमेदवारांचे उमेदवारी मिळण्यासाठीचे प्रयत्न सुरु असून इच्छुकांनी त्यांच्या प्रभागातील मतदारांना ट्रॅक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशेष सॉफ्टवेअर प्रणालीला मोबाईल अॅपचे रुप दिले आहे. या माध्यमातून प्रभागातील मतदारांची नावे एकत्रित करण्यात येत आहेत. त्यामुळे त्या प्रभागातील मतदारांची लोकसंख्या समजण्यास मदत होत असल्याचे इच्छुक उमेदवारांचे म्हणणे आहे.मोबाईलमध्ये असलेल्या या अॅपच्या माध्यमातून महिला आणि पुरुषांची लोकसंख्या, धर्मनिहाय लोकसंख्येची नोंद करण्यात येत आहे. शिवाय मतदारांची विभागणी ‘फिक्स व्होटर’, ‘नोन व्होटर’, ‘डाऊटफुल व्होटर’, ‘अपोझिट व्होटर’, ‘अननोन व्होटर’ करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी किती मतदान झाले? हे त्या त्या पक्षाच्या गटप्रमुखांना मोबाईल अॅपमध्ये केलेल्या नोंदीमधून एकत्रित करणे सहज शक्य होणार आहे. कागदांवरील नोंदीमध्ये गुरफटून जाण्यापेक्षा मोबाईल फ्रेंडली सॉफ्टवेअरमधून नोंदी करणे शक्य असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच की काय अशा प्रकारच्या मोबाईल अॅपची मागणी वाढली असल्याचे सॉफ्टवेअर निर्माते ओमकार ताम्हणकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
उमेदवार मतदारांना करताहेत ‘ट्रॅक’
By admin | Published: January 19, 2017 3:13 AM