गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात माओवाद्यांची कायम दहशत असून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर माओवाद्यांनी बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना उमेदवार मिळणेही कठीण आहे.या भागात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या माओवाद्यांनी यापूर्वी हत्या केलेल्या आहेत. एटापल्ली तालुका सध्या सूरजागड लोह खनिज प्रकल्पाच्या उत्खननावरून राज्यभर गाजत आहे. या प्रकल्पाला माओवाद्यांचा व स्थानिक ग्रामसभांचाही विरोध आहे. त्यामुळे माओवाद्यांनी या प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या राजकीय पक्षांच्या विरोधात बहिष्कार करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी माओवादी मतदारांना बहिष्काराचे आवाहन करतात. मात्र, त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर या भागात मतदान होते, असा आजवरच अनुभव राहिला आहे. प्रशासनानेही या भागात निर्भयपणे निवडणुका पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. दुसऱ्या टप्प्यात या भागात मतदान होणार आहे. या भागातील मतदानासाठी हेलिकॉप्टरचाही वापर दर निवडणुकीला करण्यात येतो. यावर्षी पेसा कायद्यासाठी लढा देणाऱ्या अनेक ग्रामसभा आपले उमेदवार राजकीय पक्षांच्या विरोधात मैदानात उतरविण्याची तयारी करीत आहेत. राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढण्याचे या भागातील अनेक उमेदवार नाकारत आहे. त्यामुळे संपूर्ण जागा लढविताना गडचिरोली जिल्ह्यात राजकीय पक्षांचीही कसोटी लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)।गडचिरोलीत १२ तालुक्यांत ५१ जिल्हा परिषद क्षेत्र व 102 पंचायत समिती गण आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी या पाच तालुक्यांमध्ये १९ मतदारसंघ आहेत. हे सर्व मतदारसंघ नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. या भागात अनेक मतदार संघांत रस्ते नाहीत, पिण्याचे पाणी नाही, चारचाकी वाहने गावापर्यंत जाऊ शकतील अशी व्यवस्था नाही. बराचसा भाग हा जंगलव्याप्त असल्यामुळे येथे माओवाद्यांचे वर्चस्व अनेक गावांमध्ये दिसून येते.
नक्षलींच्या धमकीमुळे उमेदवार मिळेनात
By admin | Published: January 19, 2017 12:30 AM