पंढरपूर : गणेश चतुर्थीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गणरायाला आवडीच्या गुलाबी कण्हेरी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली़ यासाठी ४० किलो फुले लागली असून, ती बंगळुरूहून आणली होती, अशी माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध सण, उत्सवानिमित्त विविध फुलांची व फळांची आरास करण्यात येते़ सोमवारी गणेश चतुर्थीनिमित्त बंगळुरूहून आणलेल्या गुलाबी रंगाच्या कण्हेरी फुलांची आकर्षक सजावट श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात करण्यात आली़ ही सजावट करण्यासाठी मंदिरे समितीच्या २५ कर्मचाºयांना ५ तास लागले़ गुलाबी रंगाच्या कणहेरी फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे मंदिर उजळून निघाले़ तसेच गणेश चतुर्थी असल्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार व पोशाख परिधान करण्यात आला.--------------मंदिरात बाप्पांची प्रतिष्ठापना- श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने सभामंडपात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते विधिवत पूजन व आरती करण्यात आली़ यावेळी मंदिरे समितीचे सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते़