NCP Ajit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आणि पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये राजकीय लढाई सुरू आहे. या लढाईचा पहिला अंक लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत दुसरा अंक दिसण्याची शक्यता आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर अजित पवार यांचा सूर बदलला असून ते काका शरद पवार यांच्याबाबत आक्रमक भाष्य करणं टाळताना पाहायला मिळत आहे. एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात याचीच प्रचिती आली असून अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
"समोर एक कॅमेरा आहे, तिथं शरद पवार बसलेले आहेत. त्यांना तुम्ही काय म्हणाल?" असा प्रश्न सदर मुलाखतीत अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले की, "ते माझे मोठे काका आहेत. त्यांना मी काय बोलणार? मी तर त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून बघूही शकत नाही. मी घाली बघेन."
दरम्यान, अजित पवार यांनी या मुलाखतीत कौटुंबिक नात्यावरही भाष्य केलं आहे. "पक्षफुटीनंतर पवार कुटुंबातील सदस्य एकत्र भेटतात का," या प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटलं की, "राजकारण आणि कुटुंब वेगळं आहे. मी जुलै २०२३ मध्ये सरकारमध्ये सहभागी झालो होतो. मात्र त्यानंतर आलेल्या दिवाळी सणावेळी आम्ही कुटुंबातील सदस्य एकत्र आलो होतो."
अजित पवारांकडून लोकसभा निवडणुकीतील चूक मान्य
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार कुटुंबात मोठा संघर्ष रंगला होता. अजित पवार यांनी बारामतीतून बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अशी उमेदवार देणं माझी चूक असल्याचं अजित पवारांनी मागील महिन्यात मान्य केलं होतं. "अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. पण, राजकारण घरांमध्ये शिरू द्यायचं नसतं. लोकसभेला मात्र माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. निवडणुकीवेळी पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डाना सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता, पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं, असं अजित पवार म्हणाले होते.