रेकॉर्डसाठी किती हा आटापिटा विधानसभेत आपण जे काही बोलू ते रेकॉर्ड झाले पाहिजे म्हणजे पुढे मागे त्याचा उपयोग होतो म्हणून सभासद आटापिटा करत असतात. मात्र, तसा प्रयत्न तालिका अध्यक्ष करतात तेव्हा ते फारच वेगळे वाटते. झाले असे की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी दोन दिवस सभागृहाचे कामकाज रोखून धरले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आपण काहीच बोलत नाही हे पाहून भाजपाचे आमदार अस्थस्थ होते. त्यांनी हा प्रकार काही मंत्र्यांच्या निदर्शनास आणला. तेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून योगेश सागर सभागृहात आले आणि ‘शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी सत्ताधारी भाजपाची आहे’ असे वारंवार म्हणू लागले. मधूनच ते म्हणायचे की, ‘हीच मागणी शिवसेनेची आणि विरोधकांचीही आहे...!’ त्याचे हे बोलणे ऐकूण राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले, सगळ्यांचीच मागणी आहे तर मग मान्य का करत नाही... मात्र तोपर्यंत सागर यांनी भाजपा देखील कर्जमाफीसाठी आग्रही आहे असे रेकॉर्डवर आणून सभागृह दिवसभरासाठी तहकूब करुन टाकले...!
‘पारदर्शक’ कपडे घालणार!सध्या ‘पारदर्शक’ शब्दाची चलती आहे. जो तो उठतो आणि पारदर्शक चौकशी करा, पारदर्शक कारभार करा असे म्हणत या शब्दाची टिंगल करतो. मंत्री रविंद्र वायकर यांनी देखील मी पारदर्शक चौकशी करतो असे उत्तर प्रश्नोत्तराच्या तासात देऊन टाकले. हे असे वातावरण असताना राष्ट्रवादीचे आ. दिलीप सोपल मागे कसे राहतील? नेहमीप्रमाणे ते आपला गप्पांचा फड लावून बसले होते. तेव्हा सोपल म्हणाले, आता मी पण पारदर्शक राहणार आहे. अधिवेशनात येताना पारदर्शक कपडे घालूनच येणार आहे. म्हणजे सगळं कसं नीट दिसेल...! त्यांनी नीट या शब्दावर दिलेला विशिष्ट जोर उपस्थितांना हसवून गेला नसेल तर नवल...
पेय बदलून पाहा...अधिवेशन काळात सोशल मीडियात कधी काय येईल काही सांगता येत नाही. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी विरोधीपक्षाने मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला आणि सोशल मिडीयात आयचा विषय मिळाला. मग प्रत्येकाने आपापल्या परिने हा विषय हाताळणे सुरु केले. एकाने थेट मुख्यमंत्र्यांनाच सल्ला दिला. तो असा - ‘‘दरवेळी विरोधकांना चहापानाला बोलावता आणि ते काही येत नाहीत, जरा एखाद्यावर्षी पेय बदलून पाहा... काही फरक पडतो का ते..!’’ आता हा सल्ला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला की नाही याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
मुक्काम पोस्ट सभापतींचे दालनराष्ट्रवादीला मुसंडी देत पुण्यासारख्या महापालिकेत भाजपाची सत्ता आणल्यानंतर खरे तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांचे खरे तर किती कौतुक व्हायला हवे. पण ज्या राष्ट्रवादीला सोडून खा. संजय काकडे भाजपात आले त्यामुळे बापटांचे हे लख्ख यश झाकोळले की काय कोणास ठावूक? नेहमी हसतमुख असणारे, कोट्या करणारे बापट गप्प गप्प पाहून त्यांचे परममित्र सभापती रामराजे निंबाळकरांना त्यांची काळजी वाटू लागली. त्यांनी आस्थेने बापटांची चौकशी केली पण बापटांची ‘कळी खुलता खुलेना..’ पण हल्ली सतत बापटांचा मुक्काम सभापतींच्या दालनात वाढलेला पाहून काहींच्या भूवया उंचावल्या. मात्र, विधानपरिषदेत विरोधकांचे बहुमत असल्याने सभागृहाचे कामकाज मार्गी लावण्यासाठी मला सभापतींकडे जावेच लागते... असा बापटांचा खुलासा संसदीय कार्यमंत्र्यांना शोभणारा ठरला...
-फिरस्ता