महाराष्ट्रातील वादात सापडलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून जबाबदारीतून मुक्त व्हायचे असल्याचे कळविले होते. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरून ते वादात सापडले होते. त्यांना हटविण्यासाठी विरोधी पक्षांनी राज्यात ठिकठिकाणी बंद पाळला होता. अगदी उदयनराजे, संभाजीराजे यांनी देखील मोहिम सुरु केली होती. असे असताना प्रकरण निवळल्यानंतर कोश्यारी यांनी मोदींनाच पत्र लिहून राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता महाराष्ट्रातील राज्यपाल बदलले जाणार अशी अटकळ होती. परंतू, त्यालाही बरेच दिवस झाले आहेत. केंद्रातून काही हालचाली दिसत नाहीएत. अशातच राज्याचे नवे राज्यपाल कोण असतील यावरून नावांची चर्चा सुरु झाली आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील असे बोलले जात आहे. असे असताना अमरिंदर सिंग यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल बनण्याच्या सर्व शक्यतांवर सिंग यांनी त्या अफवा आहेत असे सांगितले. मला याबाबत काहीही माहिती नाही. याबाबत माझ्याशी कोणीही बोलले नाही. हे पूर्णपणे काल्पनिक आहे. मी मोदींना जेव्हा भेटलेलो तेव्हा त्यांना मी तुमच्यासोबत असल्याचे म्हणालो होतो. ते जिथे सांगतील तिथे मी जाण्यास तयार आहे, असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.