ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ‘इसिस’च्या संपर्कात असलेल्या मुंब्रा अमृतनगर भागातील मुदब्बीर मुश्ताक शेख (३२) याला एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) ठाणे शाखेने शुक्रवारी पहाटे अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाईल, लॅपटॉप आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेली काही महिने बेकार असलेला शेख अमृतनगरच्या ‘रेश्मा अपार्टमेंट’मध्ये पत्नी आणि पाच वर्षे आणि चार महिने वयाच्या दोन मुलींसह वास्तव्याला आहे. तो ‘इसिस’च्या संपर्कात असल्याची पक्की ‘खबर’ ‘एनआयए’ ला मिळाल्यानंतर त्यांनी ही माहिती ‘एटीएस’चे महाराष्ट्राचे प्रमुख विवेक फणसाळकर यांना दिली होती. त्यांच्या आदेशानुसार एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त दरेकर, ठाणे एटीएसचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुशिल जावळे, निरीक्षक रवींद्र काटकर, निरीक्षक विकास घोडके तसेच कर्मचारी आणि एनआयएचे अधिकारी अशा २५ ते ३० जणांच्या पथकाने २२ जानेवारीच्या पहाटे त्याला ताब्यात घेतले. ‘एनआयए’च्या पथकाने दिल्लीमध्ये एकाला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्याच चौकशीमध्ये शेखचे नाव उघड झाल्यामुळे पोलिसांनी त्याच्या हालचालींवर तसेच त्याच्या इंटरनेटच्या वापरावर बारीक लक्ष ठेवले होते. गेल्या काही महिन्यांत शेख हा इसिसच्या संपर्कात असल्याचे पक्के पुरावे मिळाल्यावर त्याला जेरबंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
मुदब्बीरकडून आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत
By admin | Published: January 23, 2016 4:00 AM