मुंबई : रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असतानाच सोमवारी सकाळी अंधेरी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर एक चारचाकी गाडी थेट स्थानकातच घुसल्याची घटना घडली. गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेत एकच गोंधळ प्रवाशांमध्ये उडाला. महत्त्वाची बाब म्हणजे घटनेतील कारचालक हरमितसिंग हा युवा क्रिकेटपटू असून १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघातून खेळला आहे. यानंतर रेल्वे सुरक्षा दलाकडून हरमितसिंगला अटक केली. २0१६ च्या नोव्हेंबर महिन्यात अशीच एक घटना घडली होती. अंधेरी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर दुपारी सव्वातीनच्या सुमारास राजेश यादव याने एमएच 0६-एएफ ७५६९ मिलेनियम टोयाटो गाडी थेट प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरच घुसवली होती. या घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला होता. निदान या घटनेनंतर तरी सुरक्षा व्यवस्था चोख राहिल, अशी आशा असतानाच पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना सोमवारी अंधेरी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सकाळी सातच्या सुमारास घडली. मालाड ऐवरसेन नगर येथे राहणारा हरमितसिंग (२५) हा हुंदाई व्हेर्ना एमएच 0१-बीके-९00९ गाडीने वांद्रे पश्चिम येथील आपल्या नातेवाईकांना सोडून आपल्या घरी परतत होता. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळून जात असतानाच त्याने गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घुसवली. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ झाला. याची माहिती मिळताच प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीच्या चालकाला अटक केली. त्याची अधिक चौकशी केल्यानंतर हरमितसिंग असे त्याचे नाव असल्याचे समजले आणि १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत निष्काळजीपणे कार चालवल्याने ही घडल्याचे हरमितसिंगने कबूल केले आहे. आरपीएफकडून अटक करण्यात आल्यानंतर हरमितला जामीनही मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)दोन दिवसांत अंधेरी स्थानकात कुंपण लावले जाईल. प्रवासी आणि रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टिने आणखी काही उपाययोजना करण्यात येतील. - मुकुल जैन (पश्चिम रेल्वे-विभागीय रेल्वे व्यवस्थापक)
अंधेरी स्थानकात पुन्हा एकदा ‘कार’नामा
By admin | Published: February 21, 2017 4:13 AM