कोल्हापूर : काश्मीरमधील पूँछ येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान राजेंद्र नारायण तुपारे यांच्या पार्थिवावर मंगळवारी चंदगड तालुक्यातील मजरे-कार्वे येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शासनाकडून तुपारे यांच्या कुटुंबीयांना १५ लाखांची मदत देणार असल्याचे या वेळी जाहीर केले.सकाळी साडेआठ वाजता बेळगाव येथील मिलिटरी कँपमधून तुपारे यांचे पार्थिव कार्वे येथे आणले. गावात श्रद्धांजलीचे फलक, भगव्या पताका, तर गल्लीमध्ये रांगोळी व फुलांचा सडा घातला होता. गावाच्या प्रवेशद्वारावर पार्थिव येताच, ‘राजेंद्र अमर रहे... अमर रहे...’च्या घोषणा दुमदुमल्या. वीरपत्नी शर्मिला, वडील नारायण, आई शांता, भाऊ अनंत व संदीप, मुलगे आर्यन-वैभव व नातेवाईकांनी फोडलेल्या हंबरड्याने उपस्थितांचे काळीज हेलावले. फुलांनी सजविलेल्या लष्करी वाहनातून अंत्ययात्रा निघाली. महात्मा फुले विद्यालयाच्या पटांगणावर अंत्ययात्रा आल्यानंतर लष्कराने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. त्यानंतर बंधू अनंत व मुलगा आर्यन यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीसप्रमुख प्रदीप देशपांडे यांच्यासह खासदार, आमदार अन्य लोकप्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)