नवी मुंबई : आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यास बंदी असतानाही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही ठिकाणी चोरून वापर केला जात आहे. व्यापारी संघटनेनेही याचा वापर न करण्याच्या सूचना देवूनही अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आंबा व केळी पिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो. कॅल्शियम कार्बाईड पाण्यात टाकून केळी भिजवून घेतली जातात. रासायनिक पाण्यात भिजवल्यानंतर ती पिकविण्यासाठी ठेवली जातात. त्याचपद्धतीने आंबा लवकर पिकावा व त्याला रंग प्राप्त होण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो. यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वच आंबा कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून पिकविला जात होता. मुंबई, ठाणे व नवी मुंबईमधील किरकोळ व्यापारीही याचाच वापर करत होते. परंतु याविषयी प्रसारमाध्यमांनी वारंवार आवाज उठविल्यानंतर शासनाने त्यावर बंदी घातली. बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनीही याचा वापर बंद करावा अशा सूचना द फ्रूट अँड व्हिजिटेबल मर्चंट असोसिएशनने केल्या आहेत. बंदीनंतरही बाजार समितीमधील काही व्यापारी अद्याप कॅल्शियम कार्बाईडच्या पुड्यांचा वापर करत आहेत. खाकी कागदामध्ये पावडर भरून ती आंब्याच्या पेटीमध्ये ठेवली जात आहे. बाजार आवारामध्ये अनेक ठिकाणी अशा पुड्यांचा खच पडलेला पहावयास मिळत आहे. नवी मुंबईमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय नाही. ठाणे शहरात कार्यालय असून तिथे तक्रार करण्यासाठी कोणीही जात नाही. पोलीस व बाजार समितीचे अधिकारी काहीच कारवाई करत नाही. यामुळे कॅल्शियम कार्बाईड पुरविणारे बिनधास्तपणे वापर करत आहेत.बंदीनंतरही बाजार समितीमधील काही व्यापारी अद्याप कॅल्शियम कार्बाईडच्या पुड्यांचा वापर करत आहेत.
कार्बाईडने पिकतो आंबा!
By admin | Published: June 13, 2016 3:00 AM