संजय पाठक , नाशिकशहरातील केरकचरा संकलनासाठी असलेली घंटागाडी सेवा अनियमित असल्याची तक्रार करताना नागरिक थकले असताना महापालिकेत सत्ता आल्यास भाजपा केवळ शहर बस सेवाच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची भरारी भाजपाच्या ‘ध्येयनाम्या’त घेण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने ध्येयनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात अशाप्रकारची कल्पक भरारी मांडण्यात आली आहे.नाशिक शहरानजीक ओझर येथे नागरी हवाई सेवेसाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने २०१४ मध्ये विमानतळ बांधले. ते एचएएलकडे हस्तांतरित केले. त्यानंतर भाजपाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यापासून स्थानिक खासदार हेमंत गोडसे यांनी आजवर येथून विमान सुरू करण्यासंदर्भात अनेक आश्वासने दिलीत, परंतु राष्ट्रीय सोडाच नाशिक - मुंबई किंवा नाशिक-पुणे सुद्धा सेवा व्यवहार्य ठरलेली नाही, अशा स्थितीत भाजपाने महापालिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान सुरू करण्याचे जाहीर करून धक्का दिला आहे. विशेष म्हणजे याच जाहीरनाम्यात घंटागाड्यांच्या फेऱ्या वाढविणार असे जाहीर करून भाजपाने शहरातील ही सेवाही धड नसल्याचे मान्य केले आहे. याशिवाय राज्य परिवहन महामंडळ सव्वाशे कोटींचा तोटा झाला म्हणून जी शहर बस वाहतूक महापालिकेच्या गळ्यात टाकण्याच्या तयारीत आहेत, ती शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्याचे ध्येय (?) भाजपाने ठेवले असून, पालिकेला आणखी गाळात घालण्याची तयारी सुरू केली आहे.नाशिक शहराच्या भविष्यकालीन पाणीपुरवठ्यासाठी त्र्यंबक तालुक्यातील बेजे येथे किकवी धरण बांधण्याचा निर्णय आघाडी सरकारच्या काळातच झाला आहे. ते धरण बांधण्याच्या निविदाही आघाडी सरकारच्या काळात काढण्यात आल्या, परंतु सिंचन घोटाळ्याच्या नावाखाली भाजपा सरकारनेच त्या निविदा गेल्या वर्षी रद्द केल्या असून, त्यामुळे धरणाचे कामही रखडले आहे. विशेष म्हणजे हे धरण नाशिककरांसाठी बांधणार की, कथित समन्यायी धोरणाच्या नावाखाली नगर-औरंगाबादसाठी हे धरण बांधणार आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक महापालिका आहे की स्वतंत्र राज्य?महापालिकेच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्याचा मानस भाजपाने ‘ध्येयनाम्या’तून व्यक्त केला असून, महापालिकेचा एकूण आवाका बघता इतक्या मोठ्या योजनांसाठी नाशिक हे स्वतंत्र राज्य आहे असा भाजपाचा समज आहे की काय, अशी शंका निर्माण व्हावी अशा योजना यात आहेत. त्यात नाशिकच्या औद्योगिक वाढीसाठी स्वतंत्र औद्योगिक प्राधीकरण करणे, नाशिकमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करणे, स्वंतत्र वैद्यकीय महाविद्यालय आणि सहाशे खाटांचे रुग्णालय सुरू करणार, कायदा व सुव्यवस्थेची कठोर अंमलबजावणी करणार, गुंडगिरीला आळा घालून अवैध धंद्यांचा बंदोबस्त करणार, नाशिक शहरात पोलिसांची गस्त वाढवणार, असे महापालिकेच्या अखत्यारित नसलेल्या अनेक अफलातून योजना यात मांडण्यात आल्या आहेत. नाशिकला आयटी हब तसेच देश-विदेशांतील उद्योगांसाठी आंतरराष्ट्रीय कन्व्हकेशन सेंटर उभे करणार, महापालिकेची पर्यावरणपूरक बस सेवा तसेच ई-रिक्षा सुरू करणार, तपोवनात पाचशे खोल्यांचे पर्यटन विकास तसेच आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी पर्यटन केंद्रांची अशा अनेक महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आल्या आहेत.
घंटागाडी वेळेवर येत नाही, म्हणे विमान आणू!
By admin | Published: February 11, 2017 2:00 AM