- विलास गावंडे, यवतमाळवेतनवाढ रोखणे, वेतन थांबविणे, निलंबन, बडतर्फी यासारखी कारवाई करूनही वाहकांकडून तिकीट चोरी थांबत नाही. यामुळे एसटी महामंडळाने आता रामबाण उपाय म्हणून वाहकांच्या बदलीचे अस्त्र उगारले आहे. तिसऱ्या गुन्ह्यापासून ही कारवाई केली जाणार असून चौथ्या गुन्ह्यात थेट जिल्ह्याबाहेरच बदली केली जाणार आहे. काही वाहकांकडून तिकीट चोरी केली जात आहे. अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी विविध प्रयत्न झाले. आता अपहार सिद्ध झालेल्या वाहकांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी १ फेबु्रवारी रोजी हा आदेश काढला.भाड्याची रक्कम घेऊनही तिकीट न देणे किंवा विशिष्ट प्रवाशांना मोफत प्रवास घडविणे आदी प्रकारआढळल्यानंतर दोन वेळा सौम्य भूमिका घेऊन संबंधित वाहकावर कारवाई केली जाईल. पण तिसऱ्या प्रकरणात वाहकाची बदली आगाराबाहेर केली जाणार आहे. तर अपहार प्रकरणात थेट जिल्ह्याबाहेर बदली होईल. मार्ग तपासणी पथकातील दोषी कर्मचाऱ्यांनाही अशाच प्रकारच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)एसटीमध्ये बदली ही मोठी शिक्षा मानली जाते. गावापासून दूर राहणे, अपडाऊन करणे आदी बाबी कर्मचाऱ्यांना त्रासदायक वाटतात, असे सांगितले जाते. शिवाय नवीन भागात कामगिरी देताना दुजाभाव तर होणार नाही, याचीही भीती असते. त्यामुळेच महामंडळाने बदलीचा उपाय शोधला आहे.निलंबित आणि बडतर्फ, अपील, न्यायालयाचा आदेश आणि प्रशासकीय कारणाने पुन्हा सेवेत दाखल झालेल्या कामगार, कर्मचाऱ्याला इतर विभागात नियुक्ती दिली जाणार आहे.
तिकीट चोरी रोखण्यासाठी वाहकांच्या बदलीचे अस्त्र
By admin | Published: February 03, 2017 12:54 AM