मुंबई - रुग्णसेवा आणि प्राणीमित्रांसाठी आपले जीवन वाहुन घेणारे समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांना बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. नवी दिल्लीतील आयसीएमआर सभागृहात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. प्रकाश आमटेंचा बिल गेट्स यांच्याहस्ते सन्मान झाल्यानंतर सोशल मीडियातूनही डॉ. आमटेंवर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन कॉसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवेतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना बिल गेट्स यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यामध्ये लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे डॉ.प्रकाश आमटे यांनी 1973 मध्ये लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. तेव्हापासून भौतिक सुविधांचा प्रचंड अभाव असतानाही डॉ. प्रकाश आमटे व डॉ.सौ. मंदाकिनी आमटे यांनी अशिक्षित व गरीब आदिवासींना आरोग्य सुविधा पुरवून त्यांना शिक्षणाची संधीही उपलब्ध करुन दिली. लोक बिरादरी प्रकल्पामार्फत आदिवासी लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले असून त्यासाठी स्वत:चे संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे.
दरम्यान, यापूर्वी डॉ. प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी. लिट) पदवीने गौरवान्वित केले होते. तर, 2009 मध्ये त्यांचा रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. तर, त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन भारत सरकारनेही पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलंय. त्यानंतर, आता बिल गेट्स यांच्या हस्ते प्रकाश आमटेंचा गौरव होणं म्हणजे त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेणं आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.