लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा (जि. पुणे) : भुशी धरण मार्गावर होणारी वाहतूककोंडी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दर शनिवार, रविवार, तसेच सुट्टीच्या दिवशी दुपारी तीननंतर भुशी धरणाकडे जाणाऱ्या वाहनांना रायवूड कॉर्नरजवळ प्रवेश बंदी आणि वलवण व खंडाळा येथील एंट्री पॉइंटपासून अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १२ दरम्यान लोणावळा शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी ही माहिती दिली. शिवथरे म्हणाले, लोणावळा हे पावसाळी पर्यटनाचे मुख्य ठिकाण आहे. शहरात आल्यानंतर पर्यटनस्थळापर्यंत व पुन्हा घरी जाताना नागरिकांचा प्रवास विना अडथळा पार पडावा. याकरिता हा बदल करण्यात आला आहे. वलवण ते खंडाळा व कुमार चौक ते भुशी धरणापर्यंतचा मार्ग सीसीटीव्हीच्या कक्षेत आला आहे. वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी शिवदुर्ग मित्र, एकलव्य ग्राम सुरक्षादल व अन्य काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.भुशी धरण, वलवण, तुंगार्ली व लोणावळा धरण, राजमाची पॉइंट, कुमार चौक, सहारा पूल, रायवुड कॉर्नर भागासाठी व चार सेक्टर लोणावळा ग्रामीण परिसरातील कार्ला व भाजे लेणी, लोहगड, विसापूर, तुंग व तिकोणा किल्ला, पवना धरण परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
भुशी डॅम मार्गावर वाहनबंदी
By admin | Published: July 06, 2017 4:21 AM