ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 16 : इंदु सरकार चित्रपटासंदर्भात कॉंग्रेसकडून घेण्यात आलेल्या आक्रमक भुमिकेवर चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कॉंग्रेस एका काल्पनिक चित्रपटाला घाबरत आहे हे आश्चर्यजनक आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कॉंग्रेसचे नेते प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. हा पक्षाचा वाह्यातपणाच आहे, या शब्दांत भांडारकर यांनी टीका केली आहे. नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.मधुर भांडारकर चित्रपटासंदर्भात पत्रपरिषद घेण्यासाठी नागपुरात आले होते. मात्र कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रपरिषदेच्या स्थळी घेराव केला. त्यामुळे दिवसभर नागपुरात असूनदेखील भांडारकर यांना बोलता आले नाही. अखेर त्यांनी नागपूर विमानतळावर आपल्या भावना व्यक्त केल्या. शाई फेकण्याची धमकी देणे, चित्रपट न पाहताच गोंधळ घालणे आणि बोलण्याची संधी न देणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. हा चित्रपट काल्पनिक असून कॉंग्रेसची भुमिका अयोग्य आहे, असे भांडारकर म्हणाले. हा चित्रपट कुठल्याही राजकीय पक्षाने स्पॉन्सर केला नाही. जर असे असते तर मी १०० टक्के चित्रपट पूर्णपणे आणीबाणीवरच काढला असता आणि निवडणूकांच्या वेळी प्रदर्शित केला असता. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मी टिष्ट्वट करुन हे कधीपर्यंत चालणार, असा प्रश्न विचारला आहे. ते पक्षाचे नेते आहे. त्यामुळे त्यांनाच विचारले, असे भांडारकर यांनी प्रतिपादन केले. मी काहीशी घाबरली आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत कुणासमोर झुकणार नाही, असे चित्रपटाची अभिनेत्री किर्ती कुल्हारी हिने सांगितले.कायदेशीर दाद मागणारसेन्सॉरने या चित्रपटात १७ कट करण्यास सांगितले आहे. मात्र माझी त्यासाठी तयारी नाही. याबाबत कायदेशीर दाद मागण्यात येईल व ट्रिब्युनलमध्ये जाण्यास तयार आहोत. एखाद्या लेखकाला पुस्तकात काय लिहीले आहे, असे विचारत नाहीत. चित्रपट दाखविण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेसतर्फे होत आहे. मात्र मी कुणालाही प्रदर्शनाअगोदर चित्रपट दाखविणार नाही. आज एक बोलतोय, उद्या दुसरा कुणी बोलेल, असे भांडारकर यांनी स्पष्ट केले.
हा तर कॉंग्रेसचा वाह्यातपणा, मधुर भांडारकर
By admin | Published: July 16, 2017 7:18 PM