अकोला: विदेशातून आयात झालेल्या गाजर (पर्थेनिअम) गवताने भारतातील पन्नास लाख हेक्टर क्षेत्र व्यापले असून, पिकांवर दुष्परिणाम करणार्या या गवतामुळे सर्दी व त्वचेचे आजार वाढले आहेत. या गवताचा प्रसार वेगाने होत असल्याने त्याचा नायनाट करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (मेक्सिकन बिटल) या भुंग्याचा प्रयोग केला आहे. सन १९५६ च्या दशकात मेक्सिको,अज्रेंटिना,ऑस्ट्रेलिया या देशातून या गवताची भारतात आयात झाली आहे. सर्वप्रथम हे गवत पुण्याचे उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. परांजपे यांना दिसले. हे गवत वेगाने वाढत असल्याने महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक,जम्मू-काश्मीरचा भाग व्यापला असून, हे क्षेत्र ५0 लाख हेक्टरच्यावर पोहोचले आहे. या गवतामुळे पिकांवर दुष्परिणाम होत असून, उत्पादनात कमी होत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तसेच विविध त्वचा आजाराला कारणीभूत ठरणार्या या गवतामुळे सर्दीचे आजार होत असल्याने ज्या भागात हे गवत पोहोचले तेथे २0 ते ३0 टक्के सर्दीचे प्रमाण वाढले असून, त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. दीड ते दोन फुटांपर्यंत वाढणार्या वनस्पतीची फुले पांढरी असतात. पाऊस जास्त झाल्यास या गवताची वाढ कमी होते तथापि, कमी पावसात मात्र या गवताची वाढ वेगाने होते. त्याचा फुलोरा वार्याने एका शेतातून दुसर्या शेतात किंवा दुसर्या जागी जात असल्याने या वनस्पतीचा प्रसार झाला आहे. सर्वांसाठीच घातक असलेल्या या वनस्पतीचे निर्मूलन करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी मेक्सिकन बिटल या भुंग्याचा प्रयोग केला आहे. जबलपूर येथून हे भुंगे आणण्यात आले असून, हा भुंगा या वनस्पतीची पाने व फुले खात असल्याने या वनस्पतीच्या वाढीचा वेग कमी होतो. तसेच या झाडाला उपटून जाळल्यानेही निर्मूलन करता येते. या कृषी विद्यापीठातर्फे विद्यापीठाच्या विदर्भातील प्रक्षेत्रावरील या वनस्पतीचे निर्मूलन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
देशात पन्नास लाख हेक्टर क्षेत्रावर गाजर गवताचे साम्राज्य!
By admin | Published: August 04, 2014 8:55 PM