अतुल डोंगरे,निमगाव केतकी- तिचं हातावरचं पोट... रोजंदारीवर काम केलं तरच घरातील चूल पेटते. तिला गावच्या सरपंचपदाची संधी मिळाली. या संधीचं सोनं करण्यासाठी तिनेही कंबर कसली. चुकीची कामे करण्यासाठी तिच्यावर दबाव वाढला, प्रसंगी मारहाणही झाली. परंतु जिद्दीने ही रणरागिणी गावाच्या विकासासाठी, गाव आदर्श करण्यासाठी झटत आहे. व्याहळी (ता. इंदापूर) येथील सरपंच पल्लवी शिंदे या रणरागिणीचा हा लढा सर्व महिलांना प्रेरक आहे. व्याहळी गावासाठी सरपंच पदासाठी आरक्षण पडले. अन् त्या दोन वर्षांपूर्वी पारधी समाजातील पल्लवी शिंदे गावाच्या सरपंचपदावर विराजमान झाल्या. सत्तेचे विकेंद्रीकरण होत असताना पंचायतराजमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषदची निर्मिती झाली. पुढे अनुषंगाने पुरुषांबरोबर महिलांना आरक्षण मिळाले. अन इतक्या दिवस उपेक्षीत राहिलेल्या भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांना राजकारणात स्थान मिळाले. राज्यात अनेक ठिकाणी महिला गावचा कारभार चालवितात. पण व्याहळी गावाच्या या सरपंच महिलेची कहाणी काही वेगळीच आहे. लोकांनी निवडून दिले. सरपंच झाल्या. परंतु, कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी, प्रपंचाचा गाडा चालविण्यासाठीरोज तिला चिखलवाटा तुडवत रोजंदारीवर काम करावे लागते. पती सुकडोबा शिंदे यांच्यासह रस्त्याच्या कामावर त्या दररोज रोजंदारीसाठी जात आहेत. सरपंच पल्लवी शिंदे यांनी सांगितले, मला दोन मुले आहेत. मिळणाऱ्या मजुरीवर आम्ही चार जण सुखाचे घास खातो. गावासाठी काहीतरी करण्याची एवढी मोठी संधी मिळाली आहे. गावाचा विकास करायचा आहे. गावात गटर, पिण्याच्या पाण्याची सोय, गावातील मुलांच्या व समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करावयाचे आहे. एखाद्या सधन कुटुंबातील महिला सरपंच झाली. तर ती महिला केवळ कागदावर सहीपुरतीच सरपंच असते. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीत ‘सरपंच पती’ हे नवीन पद तयार झाले आहे. मात्र पल्लवी शिंदे या स्वत: ग्रामपंचायत कार्यालयात येऊन कामकाजाची माहिती घेतात. >दोन वर्षांतच त्यांनी गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. गावात अनेक विकासकामे करण्याचा नेहमीच प्रयत्न आहे. परंतु काही ग्रामपंचायत सदस्यांमुळे त्यांना काम करताना अडचणी येत आहेत. बेकायदेशीर कामांसाठी त्यांना ग्रामपंचायतीचे काही सदस्य सही करण्यासाठी हट्ट करतात. पण त्या काही सही करत नाही. यामुळे कित्येक वेळा सदस्यांमध्ये भांडणेही झाले आहेत. दोन वेळा त्यांना मारहाणही झाली आहे. परंतु या सर्व वेदना सहन करत सरपंचपदाला गालबोट लागू नये, म्हणून चोख कारभार करताहेत.
रस्त्यावर मजुरी करून सांभाळते गावाचा कारभार!
By admin | Published: April 05, 2017 1:08 AM