पुणे : प्रत्येक व्यक्तीलाच आयुष्यात कुठला ना कुठला छंद असतो; मात्र धावपळीच्या काळात तो जोपासणे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. पण हा ‘छंद जिवाला लावी पिसे’ या उक्तीप्रमाणे दररोज वर्तमानपत्रे वाचताना त्याने त्यातील व्यंगचित्रे पाहून केवळ स्वत:चे मनोरंजन न करता त्या व्यंगचित्रांचा वर्षभर संग्रह करण्याचा एक ‘छंद’ जोपासला.. या व्यंगचित्रांच्या संग्रहाची ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्स’ने दखल घेतली असून, महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच संग्रह असल्याची नोंद करण्यात आली आहे.हा छंद जोपासला आहे तो विलास जोगी यांनी. ‘इंडिया बुक आॅफ रेकॉडर््स’ने जोगी यांच्या छंदाची दखल घेऊन त्याची नोंद केली आहे. जोगी हे दररोज विविध मराठी, इंग्रजी वर्तमानपत्र वाचताना त्यातील व्यंगचित्र वाचनावर अधिक भर देत. एक जानेवारी २०१५ ते २८ मार्च २०१६ पर्यंतच्या वर्तमानपत्रातील व्यंगचित्रांचा संग्रह त्यांनी केला. त्यात राजकीय, शेतकरी, अर्थकारण, चित्रपट, कौटुंबिक विषयांवरील ४ हजार ८५८ व्यंगचित्रे जमा केली. ही व्यंगचित्रे इंडिया बुककडे पाठविली. त्या संग्रहाची इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्सने नोंद केली. त्यासंदर्भात नोंदीचे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह नुकतेच देण्यात आले असल्याची माहिती विलास जोगी यांनी दिली. राज्यातील अशा स्वरूपाचा पहिला संग्रह असल्याची नोंद करण्यात आली. आशिया बुक आॅफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यासाठी जोगी प्रयत्न करणार आहेत. (प्रतिनिधी)
‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्स’ने घेतली व्यंगचित्रसंग्रहाची दखल
By admin | Published: May 10, 2016 1:14 AM