ऑनलाइन लोकमत
लोकमतच्या वेबसाइटवर व्यंगचित्रकारांना हक्काचं व्यासपीठ मिळालंय. इंटरनेट आवृत्तीच्या कार्टून स्पर्धेला राज्याच्या कानाकोप-यातून भरभरून प्रतिसाद मिळाला. आमच्याकडे आलेल्या कार्टून्समधून निवड करण्याचं काम अर्थातच नामवंत व्यंगचित्रकारांनी केलं. कार्टून कंबाइन्स वेल्फेअर असोसिएशनचे प्रभाकर वाईरकर आणि निलेश जाधव यांनी आनंदानं ही जबाबदारी पार पाडली. त्यासाठी वेळात वेळ काढून हे दोघेही व्यंगचित्रकार लोकमतच्या मुंबईतील कार्यालयात आले. प्रत्येक कार्टून काळजीपूर्वक पाहिलं. त्यावर चर्चाही केली. मुख्य म्हणजे ज्यांच्या रेषांमध्ये आश्वासक गुणवत्ता आहे, त्यांचीही निवड केली.
नवे व्यंगचित्रकार तयार व्हायचे तर त्यांना थोडीबहुत मार्गदर्शनाची गरज लागणार हे या दोघांचेही मत आहे. म्हणूनच या निवडीतून लाखो लोकांपर्यंत ज्यांची कार्टून्स जाणार आहेत, त्यांना लोकमतच्या माध्यमातून मार्गदर्शन करायलाही कार्टून कंबाइन्स वेल्फेअर असोसिएशन उत्सुक आहे.
पहिल्या छाननीतून निवड झालेल्या व्यंगचित्रकारांसाठी या निवड समितीनं नव्यानं तीन विषय दिले. १६६ जणांमधून निवडलेल्या ३२ जणांना लोकमतनं मेक इन इंडिया, हेल्मेट सक्ती आणि सेल्फी हे तीन विषय पाठविले. त्यावर मिळालेल्या प्रतिसादातून निवडलेली वेचक व्यंगचित्र येताहेत हक्काच्या नव्या व्यासपीठावर. लोकमतच्या वेबसाइटवर... नेटक्या रेषांचा हा येळकोट...कधी सातमजली हास्याला तर कधी खुसखुशीला, गेला बाजार निदान मंद स्मिताला आमंत्रण देणारा...
अल्पावधीत, उत्कृष्ट कार्टून काढून परीक्षकांची मनं जिंकणारे कोल्हापूरचे व्यंगचित्रकार विनय साखरे...