खामगाव, दि. ६- तालुक्यातील पाळा येथील आश्रमशाळेत चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा प्रकार हा अतिशय गंभीर आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयापुढे सादर केले जावे, अशी मागणी राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे केली.खामगाव तालुक्यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत चिमुकलीवरील अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रविवारी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रा. पुरके यांनी पाळा येथे भेट दिली. त्यानंतर खामगाव येथील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. पाळा येथील आश्रमशाळेत अतिशय विदारक वस्तुस्थिती समोर आली आहे. दरम्यान, गत १0-१२ वर्षांंंंत ही परिस्थिती एकाही तपास अधिकार्याच्या लक्षात येऊ नये, ही बाब चिंताजनक असल्याची बाब यावेळी मोघे यांनी मांडली. शासकीय आश्रमशाळेत मुलींच्या झोपण्याच्या खोलीत अथवा हॉलमध्ये एका महिला कर्मचार्याने झोपणे आवश्यक आहे; मात्र या आश्रमशाळेत अशी कोणतीही तरतूद करण्यात न आल्याने, माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला. दरम्यान, घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून, या घटनेला आश्रमशाळा व्यवस्थापन तसेच संबंधित तपास अधिकारीही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. तपास अधिकार्यांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरदेखील कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य शासनाने संबंधित प्रकरण अतिशय संवेदनशीलपणे हाताळणे गरजेचे आहे. आश्रमशाळेतील विदारक परिस्थिती लक्षात घेता, निरीक्षण करणारी यंत्रणा कमकुवत असल्याचा स्पष्ट आरोप विधानसभेचे माजी उपसभापती तथा माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी येथे केला. प्रशासकीय यंत्रणेसोबतच आश्रमशाळा व्यवस्थापन आणि संचालन करणार्या संस्थेच्या पदाधिकार्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. झालेल्या घटनेबाबत सूक्ष्म निरीक्षण करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणीही प्रा. पुरके यांनी यावेळी केली. दरम्यान, या घटनेसंदर्भात आपले आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याशी दूरध्वनीवर बोलणे झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी आपण केल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्ञान मंदिरे हे मंदिरांपेक्षाही पवित्र असायला हवीत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केलीया पत्र परिषदेला जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, आ. हर्षवर्धन सपकाळ, माजी आ. दिलीपकुमार सानंदा, जि.प. अध्यक्ष अलका खंडारे, खामगावचे नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, लक्ष्मणराव घुमरे, कृउबास सभापती संतोष टाले, तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे, प्रकाश पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा वनारे, बलदेवराव चोपडे, पं.स. सभापती कुसुम तायडे, माजी सभापती सुरेश वनारे, श्रीकृष्ण अंधारे यांची उपस्थिती होती.
खटला जलदगती न्यायालयात चालवा!
By admin | Published: November 07, 2016 2:19 AM