उस्मानाबाद : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर पाच जणांवर एका शेतकऱ्यास फसवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रविवारी ढोकी ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत हा प्रकार घडला होता. तेरणा सहकारी साखर कारखाना ओम राजेनिंबाळकर यांच्या ताब्यात असताना गळीत हंगामासाठी कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप ढवळे यांच्या शेतीवर कर्ज उचलण्यात आले होते. त्याचा नंतर भरणा न झाल्याने ढवळे तणावाखाली होते. दरम्यान, ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच 12 एप्रिल 2019 रोजी दुष्काळी स्थिती व ओमराजे यांनी फसवणूक केल्याने जीवन संपवत असल्याची चिठ्ठी लिहून ढवळे यांनी आत्महत्या केली. याबाबत त्यांचे बंधू राज ढवळे यांनी पोलिसांत तक्रार दिली. मात्र पोलिसांनी हे प्रकरण तपासावर ठेवून ओमराजेंना तात्पुरता दिलासा दिला होता. दरम्यान, हा तपास पूर्ण झाल्यानंतर रविवारी ढोकी ठाण्यात खासदार ओमराजे यांच्यासह कारखान्यातील तत्कालीन पदाधिकारी व कार्यकारी संचालकांवर शेतकरी दिलीप ढवळे यांची फसवणूक करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उस्मानाबादच्या खासदारांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 8:33 PM