मुंबई : २००२ बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुुटुंबीयांची हत्या केल्याप्रकरणी, सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या ११ जणांनी केलेल्या अपिलावर व सीबीआयने या सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात केलेल्या अपिलावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. जानेवारी २००८ मध्ये मुंबईच्या सत्र न्यायालयाने जसवंत नाई, गोविंद नाई, शैलेश भट, राधेशाम शहा, बिपीनचंद्र जोशी, केसरभाई वोहनिया, प्रदीप मोरधिया, बाकाभाई वोहनिया, राजूभाई सोनी, मितेश भट आणि रमेश चंदन यांना सामूहिक बलात्कार व हत्येप्रकरणी जबाबदार धरत, जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.या शिक्षेविरुद्ध सर्वांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, तर सत्र न्यायालयाने या ११ जणांना त्यांच्या गुन्ह्याच्या मानाने कमी शिक्षा ठोठावली, असे म्हणत सीबीआयने या सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात अपील केले. या दोन्ही अपिलांवरील सुनावणी न्या. व्ही. के. ताहिलरमाणी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे होती. खंडपीठाने सीबीआय व दोषींची बाजू ऐकत, दोन्ही अपिलांवरील निकाल १ डिसेंबर २०१६ रोजी राखून ठेवला.सीबीआयच्या म्हणण्यानुसार, ३ मार्च २००२ रोजी या सर्व आरोपींनी राधिकापूर येथे बिल्कीस बानोच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. तिच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली, तर बिल्कीसवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्या वेळी ती पाच महिन्यांची गर्भवती होती. ही सर्व घटना गोध्रा दंगलीनंतर घडली. तिच्या घरातील सहा सदस्य मारेकऱ्यांच्या ताब्यातून सुटले.या प्रकरणाचा खटला अहमदाबाद येथील सत्र न्यायालयात सुरू झाला. मात्र, सीबीआयने आरोपी साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील, म्हणून सर्वोच्च न्यायालयात हा खटला अन्य राज्यात वर्ग करण्याचा अर्ज केला. सर्वोच्च न्यायालयाने २००४ मध्ये हा खटला मुंबई न्यायालयात वर्ग केला. (प्रतिनिधी)
बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण, उच्च न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता
By admin | Published: May 04, 2017 4:15 AM