मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय (Mohit Kamboj Bhartiya) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून मंगळवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, मोहित कंबोज यांच्यासह त्यांच्या कंपनीतील दोन संचालकांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहित कंबोज यांच्या कंपनीने 2011 ते 2015 या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या बँकेची फसवणूक करत कर्ज बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. बँकेकडून कर्ज घेतले पण कर्जाची ही रक्कम ज्यासाठी घेतली होती त्या कामासाठी न वापरता इतरत्र वापरल्याचा मोहित कंबोज यांच्यावर आरोप आहे.
दरम्यान, मोहित कंबोज यांनी स्वतः ट्विट करून आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "आज माझ्या विरुद्ध ईओडब्ल्यू मुंबईत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक बनावट एफआयआर नोंदवला आहे. माझ्या विरुद्ध एफआयआर करुन जर वाटत असेल की मी घाबरून जाईल तर तसे नाही आहे. मी तथ्यांसह न्यायालयात जाईन."
याचबरोबर, मोहित कंबोज यांनी आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओद्वारे मोहित कंबोज म्हणाले की, "मला कळालं की, मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी 2017 मध्ये बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यू काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असे वाटते की, महाविकास आघाडी सरकार असं करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं अजिबात होणार नाही. हा नवाब मलिकांचा बदला असेल किंवा संजय राऊतांचा, मी याविरोधात कोर्टात कायदेशीर लढा देईन. आम्ही याला घाबरणार नाही" असे म्हणत म्हणत मोहित कंबोज यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.