ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 11 - सात-आठ वर्षापासून पतीकडून २५ लाख रूपये मिळविण्यासाठी सतत वाद निर्माण करून, प्रसंगी मारहाण करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीला आज मंगळवारी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. रत्नागिरी जिल्ह्यातील हा पहिलाच ऐतिहासिक निर्णय असून, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गायकवाड यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.
जयगड येथील मुखत्यार महमद महामूद नाईक (५०) यांचा १९९० साली परवीन (४२) हिच्याशी विवाह झाला. २०१० सालापासून मुखत्यार आपली पत्नी आाणि दोन मुलांसह रत्नागिरीनजीकच्या खेडशी नाईकनगर येथे रहायला आला. या ठिकाणी आल्यानंतर परवीन आपल्या चैनीसाठी पतीकडे वारंवार घर व जमीन विकून २५ लाख रूपयांची मागणी करू लागली. मात्र, त्यासाठी मुखत्यार तयार नव्हता. मात्र, या गोष्टीवरून परवीन वारंवार भांडण करत असे, प्रसंगी त्याला मारझोड करून उपाशी ठेवत असे. त्यामुळे दरदिवशीच पत्नीकडून होणारा हा मानसिक आणि शारीरिक त्रास असह्य होऊन अखेर मुखत्यार याने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास गळफास घेतला.
याप्रकरणी मुखत्यार याचा भाऊ अजीज महामूद नाईक याने कुवारबाव येथील ग्रामीण पोलीस स्थानकात परवीन हिच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अनिल विभुते, उपनिरीक्षक पूनम पवार, सहायक पोलीस फौजदार डी. एस. सावंत आणि पैरवी अधिकारी म्हणून हेडकॉन्स्टेबल अनंत जाधव, महिला हेडकॉन्स्टेबल सुजाता रेवाळे, महिला पोलीस नाईक स्नेहा मयेकर यांनी तपासकाम पूर्ण केले. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी परवीन हिच्यावर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गायकवाड यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता. याकामी ११ साक्षीदार तपासण्यात आले. अतिशय जलद गतीने झालेल्या सुनावणीअंती आज मंगळवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पतीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या परवीन हिला पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास एक महिन्याच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील विनय गांधी यांनी बाजू लढविली.
पहिलीच घटना-
पत्नीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला शिक्षा झाल्याचे अनेक प्रकार समोर येतात. मात्र पतीला आत्महत्येला प्रवृत्तकेल्याप्रकरणी पत्नीला शिक्षा होण्याची ही रत्नागिरीतील पहिलीच घटना आहे.