- स्वाती पाटील यांचा इशारा
मुंबई : दहीहंडीप्रकरणी राज्य शासनाने नियम न पाळल्यास सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असे याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचे जाहीर केले आहे. मात्र अजूनही उत्सवाच्या नियमांबाबतचा संभ्रम ‘जैसे थे’ असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.स्वातंत्र्यदिनी हुतात्मा चौकात निषेधाचे थर लावताना काही अपघात घडल्यास त्यावर सुद्धा लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात तांत्रिक चुका आहेत, असा समितीने केलेला दावा चुकीचा असून, निकाल अत्यंत स्पष्ट असल्याचे पाटील यांनी म्हटले.दहीहंडी उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असताना राज्य शासनाने आयोजक आणि गोविंदा पथकांचा संभ्रम वाढवू नये, असे पाटील यांनी म्हटले. साहसी खेळाचा दर्जाप्रमाणे उत्सवाचे नियमांबाबतचे धोरण राज्य शासनाने लवकरात लवकर निश्चित करावे, असेही पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)