मुंबई: हिट अॅण्ड रनप्रकरणी अभिनेता सलमान खानला शिक्षा झालीच पाहिजे. सलमानला शिक्षा झाल्यास मद्यपी दारू पिऊन गाडी चालवण्याचे धाडस करणार नाहीत, असा दावा करीत सरकारी पक्षाने गुरुवारी आपला युक्तिवाद पूर्ण केला.विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हा युक्तिवाद केला. ते म्हणाले, ही घटना झाली तेव्हा सलमान दारू प्यायला होता. त्यानेच हा अपघात केला आहे. यात एकाचा बळी गेला आहे. याचे सर्व पुरावे न्यायालयात सादर झाले आहेत. त्यामुळे न्यायालयाने सलमानला शिक्षा ठोठवावीच. कारण सलमानला शिक्षा झाल्यास समाजात योग्य संदेश जाईल व मद्यपी दारू पिऊन गाडी चालवण्याचे धाडस करणार नाहीत, असा युक्तिवाद अॅड. घरत यांनी केला. उद्या शुक्रवारपासून अॅड. श्रीकांत शिवदे हे सलमानच्या वतीने बाजू मांडतील.वांद्रे येथे २००२मध्ये ही घटना घडली. यात एकाचा बळी गेला. या प्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे. यात दोषी आढळल्यास सलमानला १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. (प्रतिनिधी)
शिक्षा झाल्यास मद्यपी धसका घेतील
By admin | Published: April 10, 2015 4:49 AM