Sambhaji Bhide: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख असलेले संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी आता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात एक विधान केले आहे. यावरून आता वाद निर्माण झाला आहे. या विधानाचे शुक्रवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवशेनात पडसाद उमटले. यावरून काँग्रेसच चांगलीच आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांनी अटक करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांबाबत केलेले विधान वादात सापडले आहे. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नाहीत. ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र असल्याचे वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं. इतकेच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केल्याचा दावा संभाजी भिडेंनी केला. या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी केली आहे.
संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल
संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे. संभाजी भिडे यांनी अमरावतीमध्ये राष्ट्रपित्याबाबत अनुदार उद्गार काढून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रपित्याबाबत आक्षेपार्ह विधान संपूर्ण देशासाठी लाजिरवाणे असून सरकारने बंदोबस्त करून अटक करावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली होती. त्यानंतर अखेर अमरावती येथे संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावती येथील राजापेठ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधात यवतमाळ शहरात आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या. तसेच संभाजी भिडे यांची चंद्रपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. नियोजित बैठकस्थळी विरोधकांनी राडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच सतर्क होत विरोधकांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.