मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात चुकीचा मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल, ‘द वीक’ या साप्ताहिकाच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी भोईवाडा येथील न्यायालयात फौजदारी दावा केला होता. मंगळवारी झालेल्या सुनावणीनंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस. जे. बियाणी यांनी या संदर्भात दंडसंहितेच्या कलम ३४, ५०० आणि ५०२ अंतर्गत ‘द वीक’ची मल्याळम मनोरमा ही प्रकाशन संस्था, व्यवस्थापकीय संपादक फिलीप मॅथ्यू, प्रकाशक जॅकोब मॅथ्यू, संपादक टी. आर. गोपाळकृष्णन व प्रतिनिधी निरंजन टकले यांच्याविरुद्ध दावा दाखल करून घेत, न्यायालयात हजर राहाण्याचा आदेश दिला आहे. ‘द वीक’ने २४ जानेवारी २०१६ च्या अंकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारा लेख प्रसिद्ध केला होता. ‘द वीक’ने अनेक चुकीचे व आणि संदर्भहीन दाखले दिले होते. त्याबाबत रणजित सावरकर यांनी जाहीरपणे खुलासा करूनदेखील त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळेच न्यायालयात दावा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)
सावरकर प्रकरणी ‘द वीक’ला समन्स
By admin | Published: January 12, 2017 4:29 AM