- चेतन ननावरे मुंबई - प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मालवाहतूक करणाऱ्या खाजगी बसेस चा परवाना रद्द करण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. प्रवासी बसेस मालवाहतूक करताना दिसल्यास त्या जप्त करण्यास रावते यांनी सांगितले आहे. याशिवाय एसटी बसमध्येही विनापरवानगी कुरियर नेताना आढळल्यास चालक व वाहकावर प्रथम निलंबन, तर दुसऱ्या वेळेस बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात नव्याने नियमावली तयार करण्यात येणार आहे. एसटी प्रमाणेच खासगी बसेसमधील प्रवाशांना प्रति प्रवासी २० किलो सामान नेता येईल. तसेच खाजगी बसेसला प्रवासी नसताना कोणत्याही मालाची वाहतूक करता येणार नाही. एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबतही विचार करत असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच खाजगी बसेसमध्येही सीसीटीव्ही लावता येतील का? याचा विचार करत असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.एसटी बस मध्ये सापडलेल्या स्फोटकांच्या घटनेनंतर तातडीने परिवहन विभागाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी परिवहन, गृह विभागाचे उच्च स्तरीय अधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. त्यावेळी रावते यांनी या सूचना केल्या आहेत. यावेळी पोलिसांना राज्यात कुठेही आणि कधीही खासगी व एसटी बसेसची तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक एसटी स्टँडवर पोलीस चौकी उभारण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे.एसटीमधून विनापरवाना मालवाहतूक किंवा कुरिअर वाहतूक केल्यास चालक व वाहक दोघांनाही जबाबदार ठरवण्यात येईल. त्यासाठी प्रथम निलंबन करून चालक व वाहकाला एक संधी देण्यात येईल. मात्र दुसऱ्यांदा हीच गोष्ट करताना आढळल्यास थेट बडतर्फीची कारवाई करून संबंधित कर्मचाऱ्याला घरचा रस्ता दाखवण्यात येईल, असेही रावते यांनी सांगितले.