मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन विभागातील कथित घोटाळ्यासंदर्भात दिलेल्या तक्रारीत ठोस पुरावे नसल्याचा अभिप्राय देत लोकायुक्तांनी ते प्रकरण बंद केले आहे. आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या माध्यमातून परिवहन विभागात बदल्या आणि अन्य प्रकरणांत घोटाळे करण्यात आल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही त्यांच्याकडे सोमय्यांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी करण्यास लोकायुक्तांना सांगितले होते. खरमाटे यांच्या अनुषंगाने परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आले होते. लोकायुक्त व्ही. एम. कानडे यांनी स्पष्ट केले की, सोमय्या यांचे म्हणणे मी विस्ताराने ऐकले आहे. सोमय्या यांनी एका निनावी पत्राचा आधार घेत आरोप केले होते. मात्र त्यातील आरोपांची पुष्टी होईल, असे कोणतेही पुरावे समोर आले नाहीत. परिवहन मंत्री अनिल परब, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) आशिषकुमार सिंग यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळत नाही. लोकायुक्तांनी असेही स्पष्ट केले की, या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे, सोमय्यादेखील उच्च न्यायालयात दाद मागू शकतात. शासनाकडून खरमाटे प्रकरणात खुली चौकशीबजरंग खरमाटे यांच्यासंदर्भात आलेल्या तक्रारीची खुली चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. लोकायुक्तांसमोरील सुनावणीदरम्यान राज्य शासनाकडून ही माहिती देण्यात आली. त्यामुळे लवकरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणी चौकशी केली जाईल, अशी शक्यता आहे.
आरटीओतील कथित घोटाळ्यांचे प्रकरण लोकायुक्तांकडून बंद; ठोस पुरावे नसल्याचा दिला अभिप्राय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 7:16 AM