पुणे : पैसा जितका जास्त हाताळला जातो, तितकी अधिक जोखीम उत्पन्न होते. त्यामुळे ‘कॅशलेस सोसायटी’ची निर्मिती आवश्यक असून नेट बँकिंग, क्रेडीट- डेबीट कार्ड, आरटीजीएस, मोबाइल अॅपद्वारे आर्थिक व्यवहार केल्यास काळ्या पैसा रोखण्यास मदत मिळेल. मात्र त्यासाठी आर्थिक साक्षरता निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे मत राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले.लाईफ (लाईक-माईंडेड इनिशिएव्ह फॉर एम्पॉवरमेंट) संस्था आणि अर्थक्रांती जनसंसदतर्फे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दीक्षित यांच्या हस्ते ‘लाइफ स्फूर्ती सन्मान २०१६’ देऊन गौरविण्यात आले. या वेळी उद्योजक सोपान कुंजीर, अर्थक्रांती जनसंसदचे प्रभाकर कोंढाळकर, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव कटके, दयानंद फडतरे, लाइफ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओंकार कोंढाळकर आदी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावचे रुप पालटणारे सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भरेकर व वैशाली दांगट यांना या वेळी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर जालना जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक ज्योतीप्रिया सिंह या पुरस्कारार्थी उपस्थित राहू शकल्या नाहीत. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. सन्मान सोहळ्याचे यंदा द्वितीय वर्ष होते. यंदाही कार्यक्रमस्थळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या वेळी चौत्राम पवार म्हणाले, वृक्षारोपणाच्या माध्यमातून गावासाठी काम करायला सुरुवात केल्यानंतर वनवासी कल्याण आश्रम आणि अन्य संस्थांच्या मदतीने ग्रामस्थांनी श्रमदानातून गाव फुलवले आहे. आसपासच्या ८५ गावांमध्ये स्मोकलेस चूल या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून येथील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या इंद्रायणी तांदळासह स्ट्रॉबेरीलाही मोठी मागणी आहे. (प्रतिनिधी)
‘कॅशलेस सोसायटी’ आवश्यक
By admin | Published: June 13, 2016 4:25 AM