विशेष प्रतिनिधीमुंबई : वडिलांच्या अथवा त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला मिळालेल्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर पाल्यासही जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.जातीच्या दाखल्यासाठी २०१२ च्या कायद्याप्रमाणे अनुसूचित जातीच्या अर्जदाराला १९५० पूर्वीचा, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी १९६१ तर इतर मागास वर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गाकरिता १९६७ पूर्वीचा वास्तव्याचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. वडिलांचे जात वैधता प्रमाणपत्र असतानासुद्धा त्यांच्या पाल्यांना वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता पुन्हा सर्व पुरावे समितीसमोर सादर करणे बंधनकारक होते. मंगळवारच्या निर्णयामुळे किचकट प्रक्रियेत सुलभता आली आहे.सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले की, आता वडिलांकडील रक्तातील नाते संबंधातील व्यक्तीकडे (जसे वडील, भाऊ, सख्खे चुलत भाऊ व इतर) असलेल्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे डिजीटल लॉकर संकल्पना राबवण्यात येईल. वडिलांकडील रक्ताच्या नात्यातील व्यक्तींच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रांचे संकलन त्यात केल्याने प्रक्रिया गतिमान होणार आहे.समितीमार्फत थेट वैधता प्रमाणपत्र मिळेल.वडिलांचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्रासह स्वत:च्या जातप्रमाणपत्राचा अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हा समिती तो अर्ज ‘बार्टी’चे संकेतस्थळ, संबंधित समिती कार्यालयाच्या नोटीसबोर्डवर प्रसिद्ध करेल.१५ दिवसांत अर्जदाराविषयी आक्षेप नोंदवले नसल्यास जात प्रमाणपत्र देण्यात येईल.
रक्ताच्या नात्याच्या आधारे जात प्रमाणपत्र, मागासवर्गीयांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 4:45 AM