ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 6 - पोलिसांनी आता थेट आचारसंहिताभंगाचे गुन्हे दाखल करायला सुरुवात केली असून, भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वडगाव शेरी भागातील उमेदवारांविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक चारमधील भाजपाचे उमेदवार सचिन सातपुते, सोनल चव्हाण, शैलजीत बनसोडे तर त्याच प्रभागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार महेंद्र पंढरीनाथ पठारे यांच्याविरुद्ध आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाचे अधिकारी विश्वनाथ बोटे आणि महादेव राजाराम जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या उमेदवारांनी रविवारी संध्याकाळी खराडी भागामध्ये विनापरवाना कोपरा सभा घेतल्या. या सभांसाठी वडगाव शेरी भागातील निवडणूक अधिका-यांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. तर राष्ट्रवादीच्या पठारे यांनी रविवारी संध्याकाळी चंदननगरमधील भाजीमंडई, गणेशनगर, खराडी भागामधून वाहनफेरी काढली होती. या वाहनफेरीमध्ये सात मोटारींसह साधारणपणे 45 दुचाकींचा समावेश होता. निवडणूक आयोगाने तीनपेक्षा जास्त वाहनांचा प्रचार फेरीमध्ये समावेश न करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
भाजपासह राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरुद्ध आचारसंहिताभंगाचे गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2017 6:45 PM