मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "आपण जातीपातीमध्ये गुंतून पडणार असू तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व आपण घेऊन बसणार आहोत. हिंदू हा हिंदू मुस्लीम दंगलीत फक्त हिंदू असतो. तो २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला भारतीय होतो. चीननं आक्रमण केल्यावर त्याला आपण कोण कळतच नाही. मग ज्यावेळी त्याला कळतच नाही तेव्हा तो मराठी, गुजराती, तमिळ असा होतो. मग तो ज्यावेळी तो मराठी होतो, त्यावेळी तो मराठा, ब्राह्मण, आग्री असा होतो. राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे," असं म्हणत राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
"जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांना हवं आहे. ज्यावेळी १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालं. यापूर्वी जात ही जातीचा अभिमान होता. परंतु १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या जन्मानंतर त्यांनी जातीचा द्वेष करायला लावला," असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट"बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट होते. इतिहास ना वाचता तो लिहिलाय कोणी हे पाहिलं गेलं. ते ब्राह्मण आहेत, असं म्हणून टीका व्हायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं जात पात सोडून एक व्हा, त्याच महाराष्ट्रात आज जातीपातीवरून भांडणं सुरू आहेत, राजकारण सुरू आहे. जातीतून आम्ही बाहेर पडत नाही, तर हिंदू कधी होणार," असाही सवाल त्यांनी केला. ज्या महाराष्ट्राची परंपरा वैभवशाली आहे, ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र आज जातीत खितपत पडला आहे, असंही ते म्हणाले.