जातीनिहाय जनगणना व्हावी, असा ठराव विधानसभा अध्यक्षांनी मांडला होता आणि त्यास सगळ्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, त्यास सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आता केंद्राची मदत न घेता बिहारप्रमाणे महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार बिहारची माहिती मागवली असून, महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक दौऱ्यावर असताना शनिवारी म्हटले. राष्ट्रवादी भवनातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जातीनिहाय जनगणना करणे ही बाब खर्चिक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलावे लागेल. तसेच, सगळ्या समाज घटकांना कोण किती आहे? हे समजायला हवे, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, नाशिकच्या छगन भुजबळ यांच्या पालकमंत्रिपदाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, हा पक्षांतर्गत विषय आहे. मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांना खाती देणे, पालकमंत्री नेमणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मात्र पुढे चांगल्या गोष्टी घडतील.
याचबरोबर, आरक्षणासंबंधी प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. कायदा, नियमाच्या चौकटीत बसवून आरक्षण द्यावे लागेल. यापूर्वी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही. ओबीसी, मराठा समाज, इतर समाज आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यामुळे आताच्या ५२ टक्के आणि केंद्राच्या आर्थिक दुर्बलांसाठीच्या दहा टक्के आरक्षणाला धक्का न लावता न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांसंबंधी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अजित पवार म्हणाले.
कांद्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरुकांद्याच्या निर्यातशुल्काचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले असताना त्यांना हा विषय मांडायला सांगितला होता, असे अजित पवार म्हणाले. तसेच, नाशिकच्या दौऱ्यात कांदे, टोमॅटो फेकल्याच्या घटनेकडे पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवार म्हणाले, कांदे फेकले नाहीत. मला समजले, की टोमॅटोचे क्रेट्स ओतत होते. तेव्हा मी जात असतो, तर त्याबद्दल विचारले असते. मला मिळालेल्या माहितीनुसार आमच्या पूर्वीच्या पक्षातील तीन कार्यकर्त्यांनी टोमॅटोचे क्रेट्स ओतले होते.