ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - परदेशात मागणी असलेल्या द्राक्षाचे नवीन वाण राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत आज अपेडा, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ, द्राक्ष संशोधन केंद्राच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. हे वाण राज्यात उपलब्ध होण्याकरिता इच्छुकांकडून निविदा मागविण्याकरिता द्राक्ष संशोधन केंद्रातर्फे जागतिक स्तरावर निविदा काढण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असणाऱ्या द्राक्षाचे नवीन वाण महाराष्ट्रात आणून त्याचे उत्पादन करण्यात येईल. जेणेकरुन राज्यातील द्राक्ष मोठ्या प्रमाणात युरोपीयन देशांमध्ये निर्यात केले जातील. जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या द्राक्षाच्या नवीन वाणांवर ब्राझील, अमेरिका, इस्त्राईल या देशांमध्ये संशोधन करण्यात आले आहे. हे वाण राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून आज बैठकीत चर्चा करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय बाजारात महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रीक टन द्राक्ष दर वर्षी निर्यात केले जातात. नेदरलँड, जर्मनी, युरोप या देशांमध्ये महाराष्ट्रातील द्राक्षांना मागणी आहे. द्राक्षापाठोपाठ बेदाण्यांची देखील दरवर्षी 50 हजार टन निर्यात केली जाते. ही निर्यात अजून वाढविण्याकरिता परदेशात मागणी असलेल्या द्राक्षाच्या नवीन वाणांची महाराष्ट्रात उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी द्राक्ष संशोधन केंद्रामार्फत असे वाण पुरविणाऱ्यांसाठी जागतिक निविदा काढण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी येणारा खर्च 50 टक्के अपेडा, 25 टक्के केंद्रीय कृषी विभाग आणि 25 टक्के राज्य शासन देणार आहे.
द्राक्षाबरोबरच जागतिक बाजारपेठेत बेदाणा निर्यातीचे उद्दिष्ट दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार असून पुढील अनेक वर्ष द्राक्ष व बेदाणा निर्यात बाजारात टिकून राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.
बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, ‘अपेडा’चे अध्यक्ष डी.एन. सिंग, सहायक महाप्रबंधक सी.बी. सिंह, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे एम. व्ही. गायकवाड, कैलास भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.