- डॉ. जयंत वडतकरया फुलपाखराचे इंग्रजी नाव कँस्टर आणि मराठी नाव एरंडक पडले ते त्याच्या खाद्य वनस्पतीवरून. या गटातील एरंडक आणि कोनेरी एरंडक ही दोन्ही फुलपाखरे जास्तीतजास्त एरंडीच्या झाडावर आपली अंडी घालतात. ही वनस्पती ज्या भागात उपलब्ध असते त्याच भागात ही फुलपाखरे आढळून येतात. याशिवाय आग्या या वनस्पतीच्या प्रजातीसुद्धा या दोन्हीची खाद्य वनस्पती आहेत. एरंडक या फुलपाखरांच्या पंखांच्या वरील बाजूकडील रंग विटकरी असून दोन्ही पंखांवर काळ्या बारीक रेषांची नागमोडी जाळीदार नक्षी असते. या नागमोडी रेषांमधून काही ठिकाणी बदामी आकार तयार झालेला दिसतो. या काळ्या रेषा शरीराजवळ जास्त दाट असतात. पुढील पंखाच्या टोकाकडे एक बारीकसा पांढरा ठिपका असतो. नराच्या मागील पंखावर वरील बाजूस पांढरा पट्टा असतो. पंखाच्या खालील भागावरील रंग गडद विटकरी असून त्यावर फिक्कट विटकरी आणि पांढुरके नागमोडी पट्टे असतात. या फुलपाखराचा पंख विस्तार ४ ते ६ सेंमी असून उडताना मध्येच पंख उघडझाप आणि मध्येच तरंगत हळू वेगात उडते. उडताना जमिनीलगत व बसताना पंख उघडून बसते. झाडातून निघणारा रस, फुलातील मध आणि ओल्या जमिनीतून द्रव्य रूप अन्न घेतात. ज्या भागात खाद्य वनस्पतीची उपलब्धता आहे त्याच भागात आढळतात. सहसा रस्त्याच्या कडेने, गावाच्या भोवताल, मोकळ्या जंगलात, शेती प्रदेशात आणि टेकड्यांच्या पायथ्याच्या जंगलात ज्या ठिकाणी खाद्य वनस्पती उपलब्ध आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येत आढळून येतात.(लेखक महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य तसेच फुलपाखरांचे अभ्यासक आहेत.)jayant.wadatkar@yahoo.co.in
एरंडक : एक वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 5:07 AM