नाशिक : माकड गावात किंवा शहरात येणे नवीन नाही; मात्र त्र्यंबकेश्वरपासून दहा किलोमीटरवर असलेल्या वेळुंजे गावात पाहुणी आलेल्या माकडिणीचा स्वभाव जरा अजबच आहे. माकडिणीला चक्क गावातील मांजरीच्या पिल्लाचा लळा लागला असून माकड-मांजरीचे अनोखे प्रेम पहिल्यांदाच बघून गावकरी अवाक् झाले आहे; मात्र या माकडिणीचे महिलांशी मोठे वैर असल्याचे चित्र गावात पहावयास मिळते. यामुळे येथील महिलांनी या ‘पाहुणी’चा चांगलाच धसका घेतला आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रम्हगिरी, अंजनेरी पर्वतरांग माकडांच्या वास्तव्यासाठी प्रसिध्द आहे. या भागातील नागरिकांची या दोन्ही डोंगरांवर कायम ये-जा असल्याने अनेकदा काही आदिवासी प्रेमापोटी माकडांचे लहान पिल्लू पाळण्यासाठी घरी घेऊन येतात; मात्र माकड हा संरक्षित वन्यजीव असल्यामुळे त्याला पाळण्याच्या हेतूनेही घरी ठेवणे कायद्याने गुन्हा ठरतो.
वेळुंजेचा पाहुणचार घेणारी माकडिणदेखील अशीच कोणाच्या तरी घरी लहानपणापासून असावी व त्याचा सांभाळ क रणाºया व्यक्तीने तिला मोठी झाल्यावर सोडून दिले असावे, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. कारण ही माकडिण वेळुंजेमधील मानवी वस्तीतून जंगलात जाण्यासाठी तयार नाही. ती येथील मुले, माणसांच्या अंगखांद्यावर खेळताना दिसून येते. पंधरवड्यास तिला मांजरीच्या लहान पिल्लाचाही लळा लागला आहे.
या गावात त्र्यंबकेश्वर वन परिक्षेत्राच्या अधिकाºयांनी बुधवारी (दि.४) भेट दिली. येत्या दोन दिवसांत माकडिणीला ताब्यात घेतले जाणार असल्याचे परिक्षेत्र अधिकारी कैलास आहिरे यांनी सांगितले.