ऑनलाइन लोकमत -
अहमदनगर, दि. 04 - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकी देणा-या आरोपीला अटक करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे यांनी 'ज्या गांभीर्याने मला धमकी देणार्या आरोपीचा पोलिसांनी शोध घेतला तशाच प्रकारे डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांची हत्या करणारे आरोपी पकडले जावेत व त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी', अशी मागणी केली आहे.
'मला अनेक वेळा धमक्या आल्या. पण मी अशा धमक्यांना कधीच भीक घालत नाही. अशा वेळी नेवासा येथून वारंवार धमक्या येत होत्या. हे कृत्य करणारा आरोपी पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडला. पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना धन्यवाद देतो. कायदा व सुव्यवस्था या दृष्टीने पोलिसांनी दाखवलेली तत्परता महत्त्वाची आहे', असं अण्णा हजारे बोलले आहेत. 'धमकी देणारा आरोपी सापडला असल्याने आता सरकारने माझे संरक्षण कमी करावे... संरक्षणासाठी फार मोठी यंत्रणा वापरली जाते हे बरे वाटंत नाही', असं मतही अण्णा हजारेंनी व्यक्त केलं आहे.