मुंबई : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेसह (एआयसीटीई) स्थानिक विद्यापीठे आणि तंत्रशिक्षण संचालनालयाला (डीटीई) खोटी प्रतिज्ञापत्रे सादर केलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी सिटीझन फोरमने केली आहे. येत्या आठवड्याभरात प्राचार्यांविरोधात गुन्हे दाखल केले नाही, तर एआयसीटीई, डीटीई आणि स्थानिक विद्यापीठांच्या कुलगुरूंविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा फोरमने गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.फोरमचे निमंत्रक वैभव नरवडे म्हणाले की, राज्यातील ३४६ अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांची वानवा असल्याचा अहवाल खुद्द डीटीईच्या संचालकांनी पाठवला होता. त्यानंतर डीटीईने संबंधित महाविद्यालयांना त्रुटी दूर केल्या नाही, तर कारवाई करण्याच्या नोटिसाही धाडल्या. मात्र अद्याप संबंधित महाविद्यालयांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. एआयसीटीईने आत्तापर्यंत राज्यातील ५४ महाविद्यालयांना मान्यता दिलेली नाही. तर एकूण १३१ महाविद्यालयांच्या प्रवेशाच्या जागांत कपात करण्यात आली आहे. मात्र केवळ २०० महाविद्यालयांची चौकशी करून उरलेल्या १४६ महाविद्यालयांना सूट देण्यामागील कारण अद्याप एआयसीटीईने स्पष्ट केलेले नाही. (प्रतिनिधी)>महाविद्यालयांना इतरत्र हलवावेज्या ठिकाणी बांधकाम पूर्ण नाही, भोगवटा प्रमाणपत्र नाही अशा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना इतरत्र हलवावे. त्रुटी असलेल्या महाविद्यालयांचे शुल्क शिक्षण शुल्क समितीने कमी करावे, अशी मागणी फोरमने केली.
‘त्या’ महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर गुन्हे दाखल करा
By admin | Published: May 20, 2016 2:52 AM