मुंबई : वैद्यनाथ अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेवरील छापेसत्रानंतर सीबीआयने बॅँकेच्या राज्यभरातील विविध शाखांतील खात्यांची चौकशी सुरू केली आहे. बॅँकेत ८ नोव्हेंबरनंतर जमा करण्यात आलेल्या रकमा, खातेदार व त्यांच्या व्यवहाराचा तपशील मिळविला जात असून, याबाबत आवश्यकता वाटल्यास बॅँकेच्या संचालक मंडळांकडे चौकशी केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल केलेले पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, औरंगाबाद येथील डॉ. सुरेश टाकळकर यांना चौकशीसाठी लवकरच बोलावण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. भाजपाच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे संचालक असलेल्या वैद्यनाथ सहकारी बॅँकेच्या दोघा अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे सहकाराबरोबरच राजकीय वर्तुळातही याबाबत चर्चा सुरू आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, बीड या ठिकाणांवरील वैद्यनाथ बँकेच्या शाखा, अधिकाऱ्यांच्या केबिन व निवासस्थानांच्या झडतीमध्ये सीबीआयच्या हाती महत्त्वपूर्ण कागदपत्रे लागलेली आहेत. त्यांची तपासणी केली जात असून, त्याद्वारे आणखी ‘बडे मासे’ या प्रकरणात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
वैद्यनाथ बँकेतील खात्यांची सीबीआयकडून चौकशी
By admin | Published: December 25, 2016 3:05 AM