मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. CBI चे एक पथक शुक्रवारी सकाळीच राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA च्या कार्यालयात दाखल झाले आहे. उच्च न्यायालयाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. (Central Bureau of Investigation CBI officials arrive at NIA office)
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा NIA तपास करत आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत असून परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेल्या आरोपांत सचिन वाझेंचाही उल्लेख आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सीबीआय एनआयएच्या तपासात समोर आलेली माहिती गोळा करत आहे.
तपासाचा मार्ग मोकळा
मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर १५ दिवसांमध्ये सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने परमबीर यांची याचिका निकाली काढताना त्यांनी आपल्या तक्रारी संबंधित व्यासपीठासमोर मांडाव्यात, असे स्पष्ट केले. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या अनिल देशमुख आणि राज्य सरकारला दिलासा मिळाला नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांच्या याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे सीबीआय तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
खरे कोण, परमबीर सिंग की सचिन वाझे?; पत्रांमधील विसंगतीनं संशय वाढला
दरम्यान, परमबीर सिंग व अनिल देशमुख हे दोघेही राज्य सरकार व प्रशासनामध्ये उच्च पदांवर कार्यरत होते. दोघांनी मतभेद होण्यापूर्वी एकत्र काम केलेले आहे. या प्रकरणातील उच्चपदस्थ आणि झालेले गंभीर आरोप पाहता स्वतंत्र चौकशी पाहिजे, असे नमूद करत आरोप करणारी व्यक्ती म्हणजेच परमबीर सिंग राज्य सरकारची शत्रू नव्हे तर प्रशासनाशी हातात हात घालून काम करणारी होती. उच्च न्यायालयाने निर्देश दिले तेव्हा देशमुख मंत्री होते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.